काँग्रेसचे आणखी काही आमदार गळाले किंवा नाही गळाले, तरी भाजप यंदाही चौथा उमेदवार उतरवणार असल्याची चर्चा आहे. या स्थितीत काँग्रेसला उबाठा गट आणि शरद पवार गटाची मदत घ्यावी लागणार आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांनी गुरुवारच्या आपल्या अपेक्षित निर्णयात पवार गटाच्या आमदारांचेही सदस्यत्व रद्द केले आणि एकनाथ शिंदे गटाने विधानसभेत व्हीप बजावला तर काय होईल? हा पेच काँग्रेस हायकमांडसमोर आहे. उरलेल्या ४२ पैकी आणखी काही काँग्रेस आमदारांनी आधीच्या निवडणुकीत चव्हाण व सिद्दीकी यांच्या पावलावर पाऊल टाकून क्रॉस व्होटिंग केले, तर काय, ही भीती कायम आहे.
तीन शक्यता कोणत्या?
भाजपने चौथा उमेदवार दिला, तर काँग्रेसचं टेन्शन वाढणार आहे. कारण पहिल्या शक्यतेनुसार, अशोक चव्हाणांपाठोपाठ त्यांचे काही समर्थक आमदार क्रॉस व्होटिंग करु शकतात. या स्थितीत काँग्रेसला उबाठा गट आणि शरद पवार गटाची मदत घ्यावी लागेल. परंतु दुसऱ्या शक्यतेनुसार विधानसभा अध्यक्षांनी पवार गटाच्या आमदारांचेही सदस्यत्व रद्द केले, तर समीकरणं आणि मतांचा कोटा बदलेल. तिसरी शक्यता म्हणजे, एकनाथ शिंदे गटाने विधानसभेत व्हीप बजावला, तर ठाकरेंच्या आमदारांचीही अडचण होईल.
राज्यसभेच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी भाजपने सोमवारी उमेदवारांची आणखी एक यादी दिल्लीतून जाहीर केली. हिमाचल प्रदेशातील सत्ता गेल्याने भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गुजरातमधून राज्यसभेवर पाठवण्याचे पक्षश्रेष्ठींनी ठरविल्याचे दिसते आहे. या निवडणुकीत ५६ पैकी फक्त १० जागा मिळणार असलेल्या काँग्रेसनेही सोमवारी पक्षनेत्या सोनिया गांधी यांच्यासह राज्यसभेच्या ४ जागांसाठी उमेदवारी जाहीर केली. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, गुरुवार हा अखेरचा दिवस आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांना हिमाचल प्रदेशातून तिकीट देण्यात आले आहे. मध्य प्रदेशातील एक, तेलंगणातील दोन आणि कर्नाटकातील तीन अशा सहा राज्यसभा जागांसाठी काँग्रेसचे उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाहीत. भाजपने जाहीर केलेल्या यादीत सात जणांच्या नावांचा उल्लेख करण्यात आला असून, त्यापैकी चार गुजरातमधून आहेत. त्या यादीत नड्डा यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. गोविंद ढोलकिया, मयंक नायक व जसवंतसिंह परमार यांचीही नावे या यादीत आहेत. भाजपने गुजरातमधून या चार जणांना राज्यसभेचे उमेदवार केले आहेत.