• Mon. Nov 25th, 2024

    ‘राज्यसभा’ बिनविरोध? भाजप चौथा उमेदवार देणार नाही, बावनकुळेंनी कारणही सांगितलं

    ‘राज्यसभा’ बिनविरोध? भाजप चौथा उमेदवार देणार नाही, बावनकुळेंनी कारणही सांगितलं

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बुधवारी अधिकृत उमेदवारांची घोषणा केली. भाजपने बुधवारी तीन उमेदवार दिले असले तरी भाजपचे धक्कातंत्र पाहता ते आज, गुरुवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी चौथा उमेदवार देऊन काँग्रेसची चिंता वाढवतील अशी चर्चा होती. मात्र चौथा उमेदवार देणार नसल्याचे भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी स्पष्ट केल्याने आता राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याची केवळ औपचारिकता उरल्याचे चित्र आहे.

    भाजपने अपेक्षेप्रमाणे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसने माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने माजी केंद्रीय राज्यमंत्री मिलिंद देवरा यांना उमेदवारी दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने प्रफुल्ल पटेल यांना उमेदवारी दिली आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला रामराम ठोकून मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केल्यापासून भाजपने राज्यसभा उमेदवारांची यादी लांबवली होती. यादी लांबल्याने चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवले जाईल हे जवळपास निश्चित झाले होते. त्यानुसार भाजपने अशोक चव्हाण यांना पहिल्या क्रमांकाचे उमेदवार म्हणून घोषित केले आहे.

    भाजपने कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना राज्यसभेवर जाण्याची संधी दिली आहे. २०१९च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी देऊन भाजपने कुलकर्णी यांची नाराजी ओढवून घेतली. गेली साडेचार वर्षे राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुलकर्णी यांना भाजपने राज्यसभा उमेदवारी दिली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.

    १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक

    राज्यसभेतील महाराष्ट्रासह १५ राज्यांमधील ५६ सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. या जागांसाठी २७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची तारीख १५ फेब्रुवारी आहे.

    ‘चौथा उमेदवार देणार नाही’

    राज्यसभा निवडणुकीत भाजप चौथा उमेदवार देणार नाही, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. त्यामुळे राज्यसभा निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘राज्यसभा निवडणूक १०० टक्के बिनविरोध होईल. कारण सर्वांकडे आपापला मतांचा कोटा आहे. सर्वांकडे जिंकून येण्याचा कोटा असेल तर चुरस निर्माण करून महाराष्ट्राला वेगळ्या दिशेला नेण्याची गरज नाही. आम्ही चौथा उमेदवार देणार नाही. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल’, असे बावनकुळे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed