• Mon. Nov 25th, 2024

    जनता हीच माझी ऊर्जा.. जनतेची सेवा हेच माझे ध्येय  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ByMH LIVE NEWS

    Feb 14, 2024
    जनता हीच माझी ऊर्जा.. जनतेची सेवा हेच माझे ध्येय  -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    ठाणे,दि. १४ (जिमाका): जनतेला भेटल्यानंतर मला काम करण्याची ऊर्जा मिळते. जनतेची सेवा या ध्येयानेच मी काम करीत आहे. यासाठीच शासनाच्या माध्यमातून जनतेला उत्तम दर्जाची आरोग्य सेवा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले.

    मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील ‘मूलभूत सोईसुविधांचा विकास’ या योजनेंतर्गत मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील स. क्र. १३ (९२पै), महाजनवाडी, मीरा रोड येथे उभारण्यात आलेल्या ‘मातोश्री इंदिराबाई बाबूराव सरनाईक सुपरस्पेशालिटी (कॅशलेस काऊंटर) रुग्णालय’ तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिकेने दिव्यांगांच्या उपचाराकरिता उभारलेल्या ‘फिजिओथेरपी आणि बहुविद्याशाखीय पुनर्वसन केंद्रा’चे ई-अनावरण व लोकार्पण मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते पार पडले, तसेच जिल्हा वार्षिक नियोजनच्या निधीतून मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी खरेदी केलेली वाहने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस आयुक्तालयाला सुपूर्द करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. प्रारंभी मुख्यमंत्र्यांनी कोनशिलेचे अनावरण केले आणि रुग्णालयाची पाहणी केली.

    यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन, आमदार पराग शहा, माजी आमदार रवींद्र फाटक, आयुक्त तथा प्रशासक संजय श्रीपतराव काटकर (भा.प्र.से.), पोलीस आयुक्त मधुकर पाण्‍डेय, अप्पर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे, अतिरिक्त आयुक्त अनिकेत मानोरकर, अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे, उपायुक्त संजय शिंदे, उपायुक्त रवी पवार, उपायुक्त कल्पिता पिंपळे, शहर अभियंता दीपक खांबित या मान्यवरांसह विभागप्रमुख, माजी नगरसेवक/नगरसेविका, महापालिका अधिकारी – कर्मचाऱ्यांची तसेच स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

    आज लोकार्पण केलेल्या या रुग्णालयाची मी पाहणी केली. हे रुग्णालय पंचतारांकित दर्जाचे आहे. या माध्यमातून लोकांना उत्तम आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे, याचे समाधान वाटते, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

    मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, नवनवीन विकास कामे सुरू आहेत, बंद असलेली विकास कामे पुन्हा वेगाने सुरू केली आहेत. दहिसर ते डहाणू, विरार ते अलिबाग कॉरिडॉर मार्गाचे काम हाती घेतले आहे. ॲक्सेस् कंट्रोल, ग्रीन फील्ड पद्धतीने पनवेल-गोवा महामार्गासह इतरही महामार्गाचे काम लवकर पूर्ण होईल.

    गरजू रुग्णांना कॅशलेस सेवेमुळे आवश्यक उपचार विनामूल्य मिळणार आहेत. शासनाने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंत वाढ केली. सुमारे साडेबारा कोटी जनतेला मोफत आरोग्य सुविधा देण्यात आली असून मागील दीड वर्षात 180 कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे देण्यात आली. सर्वसाधारण नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी हे शासन प्रयत्नशील आहे. संपूर्ण महाराष्ट्रात विविध योजनांच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगून ते म्हणाले की, मागील काही काळात जवळपास ४ कोटी महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली आहे. आरोग्य पूर्व तपासणी (Early Detection) महत्त्वाची असून त्यामुळे आजाराचे निदान लवकर होवून संबंधित आजारावर लवकर मात करता येते. ‘आयुष्यमान भारत’ ही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशाला दिलेली मोठी भेट आहे. केंद्र सरकारच्या सहकार्याने आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्र शासनही उत्तम काम करीत आहे. ‘फिरती आरोग्य सेवा’ ही संकल्पना सर्वत्र राबवित आहोत.

     

    ‘डीप क्लीन ड्राईव्ह’ बाबत मुख्यमंत्री म्हणाले की, हे अभियान ही एक चळवळ बनली आहे. मुख्यमंत्री स्वतः मैदानात उतरून काम करीत आहेत त्यामुळे अधिकारीही फील्ड वर काम करताना दिसत आहेत. असेच सर्वत्र दिसायला हवे, शासन आणि प्रशासनाने लोकांच्या कामांसाठी मैदानात जायला हवे. या अभियानामुळे प्रदूषण कमी होत आहे. या अभियानाला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानाच्या यशाचे खरे श्रेय स्वच्छता कर्मचाऱ्यांचे आहे. त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे. त्यांनी चांगले काम केले. म्हणूनच  त्यांनाही आपण सोयीसुविधा दिल्या, त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी कार्यवाही सुरू केली.

    कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करायला हवे,असे आवाहन करीत मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, क्लस्टर विकास (Cluster Developement) योजनेला मंजूरी देऊन त्यातून गरजू लोकांना घरे देत आहोत. राज्यात 10 लाख हेक्टर जमिनीवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. राज्यातील शाळा चांगल्या सर्व सोयीसुविधायुक्त असाव्यात, त्या माध्यमातून मुलांना चांगले शिक्षण मिळावे,यासाठीही राज्य शासन प्रयत्नशील आहे.

    आमदार प्रताप सरनाईक, आमदार श्रीमती गीता जैन यांचे उत्तम काम करत असल्याबाबत अभिनंदन करून मीरा-भाईंदर या शहरातही कॅन्सर हॉस्पिटल उभे करू. त्याचप्रमाणे पत्रकारांसाठी घरे या विषयाबाबतही योग्य निर्णय घेवू,असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चुकीचे वृत्तांकन होणार नाही किंवा अफवा पसरू नये, याची काळजी घेत जबाबदारीने सकारात्मक वृत्तांकन केल्याबद्दल मीरा-भाईंदर या परिसरातील पत्रकारांचा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी उत्तम काम केल्याबद्दल पोलीस आयुक्त मधुकर पाण्‍डेय व मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक संजय काटकर यांचाही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

    मंचावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

    मीरा रोड येथील भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृहालगतच मीरा-भाईदर महापालिकेचे पहिले कॅशलेस रुग्णालय बांधण्यात आले आहे. शहरातील पहिले व राज्यातील हे दुसरे सरकारी कॅशलेस  रुग्णालय असणार आहे. या रुग्णालयात एकंदर १०० खाटांची सुविधा आहे. रुग्णालयाची इमारत महापालिकेला विकासकाकडून मोफत बांधून मिळाली आहे तर रुग्णालयात आवश्यक असलेली सर्व आधुनिक यंत्रसामग्री व वैद्यकीय उपकरणे आमदार श्री. सरनाईक यांच्या प्रयत्नातून खरेदी करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णालयासाठी महापालिकेचा एक रुपयाही खर्च झालेला नाही. राज्य सरकारच्या ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ अंतर्गत सर्व वैद्यकीय उपचार, महत्त्वाच्या शस्त्रक्रिया रुग्णालयात मोफत होणार आहेत. कर्करोग उपचारासह अँजिओप्लास्टी, बायपास हार्ट सर्जरी, व्हॉल्व्ह बदलणे आणि पेसमेकर अशा अनेक मोठ्या शस्त्रक्रिया व त्यावरील उपचार या ठिकाणी मोफत होणार आहेत. त्यामुळे पिवळे आणि केशरी शिधा पत्रिकाधारक रुग्णांना त्याचा लाभ मिळणार आहे. उद्यापासून या रूग्णालयात ओपीडी सुरू होणार असून पुढील १० दिवसात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून शासनाची मान्यता घेवून गरजू रूग्णावर आवश्यक त्या शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.

    ०००

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *