राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच शिवरायांच्या गुरु आणि मार्गदर्शक होत्या, त्यांनी महाराजांना प्रेरणा दिली. याच प्रेरणेतून स्वराज्य स्थापन करायचे या ध्येयाने शिवरायांनी मावळ्यांचे सैन्य उभे करुन स्वराज्याची उभारणी केली, हा इतिहास आहे. याच इतिहासातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रेरणा घेतो, अशी ठाम भूमिका राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांनी मांडली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे येत्या शिवजयंतीच्या निम्मिताने आयोजित ‘स्वराज्य सप्ताहा’ कार्यक्रमाच्याच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
योगी आदित्यनाथ यांचा दादांकडून समाचार
दरम्यान, रविवारी आळंदी येथे गीता-भक्ती अमृतमोहत्सव सोहळ्याला उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी समर्थ रामदास स्वामी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना घडविण्याचे काम केले, असे विधान केले होते. त्यानंतर आज अजित पवार यांनी स्वराज्य सप्ताहनिमित्त आयोजित कार्यक्रमात जिजाऊंनी शिवाजी महाराजांची जडणघडण केली असे ठामपणे सांगत योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे खंडन केले आहे.
भाजपसोबत युतीत गेल्यानंतरही भूमिका कायम
तर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कायमच शिवाजी महाराजांच्या ‘रयतेचे राज्य’ या संकल्पनेतून प्रेरणा घेतली असे, सांगत आपण बहुजनवादी विचारधारेसोबत कायम असल्याचे संकेत अजित पवार यांनी यावेळी दिले. या मेळाव्यात योगी आदित्यनाथ यांच्या विधानाचे अप्रत्यक्ष खंडन करून अजित पवार यांनी लाल महाल मधील दादोजी कोंडदेव यांच्या पुतळ्याच्या वादापासून त्यांनी घेतलेली भूमिका भाजपसोबत राजकीय युतीत गेल्यानंतरही कायम असल्याचे दाखवून दिले आहे.
यापूर्वीही अजित पवार यांनी महायुतीत येण्याअगोदर छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते ही भूमिका मांडली होती, त्यामुळे शिवरायांच्या इतिहासबद्दलची आपली सामाजिक भूमिका ठाम आहे हे आज स्वराज्य सप्ताहानिमित्त आज अजित पवार यांनी योगी आदित्यनाथ यांच्या मताचे अप्रत्यक्षरित्या खंडन करून ती बाब अधोरेखित केली आहे.