पुण्यातील वडगाव येथे राहणारी प्रतिक्षा जाधव आणि धायरी येथे राहणारा सिद्धांत कांबळे. दोघांच्या जाती वेगवेगळ्या. त्यांची ओळख कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना झाली. सुरुवातीला एकमेकांकडे बघणे, त्यानंतर तासनतास मोबाईलवर चॅटिंग अशा गोष्टी सुरू झाल्या. त्यानंतर मोबाईलवरूनच सिद्धांतने प्रतिक्षाला प्रपोज केले. तिने देखील कुठलेही आढेवेढे न घेता त्याच्या प्रेमाचा स्वीकार केला. सिद्धांतने याबाबत घरी सांगितल्यानंतर त्याच्या कुटुंबियांकडून फारसा विरोध झाला नाही. मात्र खरा ट्विस्ट आला तो मुलीच्या वडिलांकडून.
प्रतिक्षाच्या घरी याची कुणकुण लागल्यानंतर तिच्या वडिलांनी तिचे सिद्धांतसोबतचं बोलणं बंद केलं. कित्येक दिवस त्यांना एकमेकांशी बोलता आले नाही. मात्र काही दिवसांनंतर प्रतिक्षाने स्वतःहून बहिणीच्या फोनवरून सिद्धांतला फोन केला. त्यानंतर पुन्हा त्यांचं बोलणं सुरू झालं. प्रतिक्षाच्या वडिलांना सिद्धांतसोबत राहणं आवडत नव्हतं. या परिस्थितीत देखील सिद्धांत आणि प्रतिक्षाने पळून जाण्याचा कधीही विचार मनात आणला नाही. प्रतिक्षाच्या वडिलांना मनविण्यासाठी सिद्धांतने खूप कष्ट घेतले. त्यांना कसा जावई हवा आहे, त्यांच्या काय अपेक्षा आहेत, अशी सगळी माहिती घेऊन त्यांच्या नजरेत चांगलं बनण्याचा त्याने प्रयत्न केला.
प्रतिक्षाचे वडील एकदम शिस्तबद्ध व्यक्ती. मुलीने आपल्या शब्दाबाहेर जाऊन कोणतीही गोष्ट करू नये असे त्यांना नेहमी वाटत. मात्र मुलीचे प्रेम प्रकरण समजल्यानंतर त्यांनी विरोध दर्शवला. काही महिने सिद्धांत आणि प्रतिक्षा हे एकमेकांपासून वेगळे होते. मात्र कुटुंबियांचा विरोध पत्करून सिद्धांत आणि प्रतिक्षा यांनी एकमेकांवरील विश्वास जराही कमी होऊ न देता एकमेकांसोबत ठामपणे उभे राहिले. शेवटी सहा वर्ष चाललेल्या या लव्हस्टोरीला घरच्यांकडून ग्रीन सिग्नल मिळाला. कुटुंबियांचा होकार मिळाल्यावर दोघांच्याही आनंदाला पारावर उरला नाही.
आंतरजातीय विवाह म्हटलं की अनेकदा घरच्यांकडून विरोध केला जातो. त्यामुळे अनेक मुलं मुली पळून जाण्याचा विचार करतात. त्यातून कधी सैराट सारखी उदाहरणे समोर येतात. कधी कधी मुलं मुली यातून टोकाचे निर्णय घेऊन स्वतःचं आयुष्य संपवतात. घरात कितीही उच्चशिक्षित लोक असले तरीही आंतरजातीय विवाहाबाबत नकारात्मक विचार केला जातो. कारण यातून घरादाराची अब्रु जाते, लोक नावं ठेवतात याच मानसिकतेतून अनेकांनी आपल्या मुलांना गमावले देखील आहे. मात्र या सर्वांना आदर्श वाटावा अशी सिद्धांत आणि प्रतिक्षा यांची आंतरजातीय विवाहाची गोष्ट आहे.