• Sat. Sep 21st, 2024

मुंबईतील जलवाहिन्या झाल्या जुन्या, नागरिकांना वारंवार पाण्याच्या समस्या, BMC बांधणार जलबोगदा

मुंबईतील जलवाहिन्या झाल्या जुन्या, नागरिकांना वारंवार पाण्याच्या समस्या, BMC बांधणार जलबोगदा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतला पाणीपुरवठा करणारे जलवाहिन्यांचे जाळे जुनाट झाले आहे. त्यामुळे जलवाहिन्यांच्या समस्येतून मुंबईकरांना वारंवार पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही बाब लक्षात घेऊन, शहराच्या विद्यमान पाणीपुरवठा जाळ्याला बळकटी आणण्यासाठी महापालिकेने ठाण्याच्या कशेळी ते मुलुंडपर्यंत नवीन जलबोगदा बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून निविदा महिनाभरात निघण्याची शक्यता आहे.

मुंबईला भातसा धरणातून दररोज दोन हजार दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. यापैकी सुमारे १४०० दशलक्ष लिटर पाण्यावर पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया केली जाते. पांजरापूर येथे प्रक्रिया केलेले पाणी येवई महासंतुलक जलाशयातून, मुंबई-२ व मुंबई-३ या दोन मुख्य जलवाहिन्यांमार्फत मुंबईपर्यंत वाहून आणले जाते. उर्वरित ६०० दशलक्ष लिटर पाणी येवई येथील वैतरणा/अप्पर वैतरणा या जलवाहिन्यांमार्फत शुद्धीकरण प्रक्रियेसाठी भांडुप संकुल जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाठविले जाते.

मुंबई-नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणामुळे आणि सुरक्षित पाणीपुरवठ्याच्या दृष्टिकोनातून जमिनीवर कार्यान्वित असलेल्या मुख्य जलवाहिन्यांसाठी पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. त्यासाठी कशेळी ते मुलुंडदरम्यान अतिरिक्त क्षमतेसह जलबोगदा बांधण्याचे प्रस्तावत आहे, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आली.

हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पालिका या जलबोगद्याचा पाणीपुरवठ्यासाठी वापर करण्यास सुरुवात करणार आहे. विद्यमान जलवाहिन्यांचे जाळे हे संरक्षित (बॅक-अप) म्हणून असेल. बोगद्यामुळे पाणीपुरवठ्यात फार मोठी वाढ होणार नसली, तरी प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट पाणीपुरवठा मालमत्ता सुरक्षित करणे हे आहे. ठाणे, पालघर, नाशिकमधून येणाऱ्या जलवाहिन्या या जमिनीवर असल्याने त्यांना धोका आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या बोगद्यातून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे, असे पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

योजनेतील पाईपलाईनला गळती, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; अधिकाऱ्याच्या अंगावर पाणी ओतलं

आपत्कालीन परिस्थितीत गरज

सुरक्षेचा उपाय म्हणून, शहराची पाणीपुरवठ्याची संरक्षित योजना आवश्यत असते. संरक्षित योजना नसते, तेव्हा आपत्कालीन परिस्थितीत पाणीपुरवठा खंडित होण्याची भीती असते. त्यामुळे नवीन संरक्षित पाण्याच्या बोगद्याची वारंवार गरज भासते आहे. याचा अनुभव पाणीकपातीच्या पार्श्‍वभूमीवर आला आहे. जलवाहिन्या फुटल्यामुळे गेल्या वर्षभरात शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला आहे. डिसेंबरमध्ये अंधेरीच्या वेरावली जलवाहिनीत तसेच मेट्रोच्या कामांमुळे जलवाहिन्या फुटल्या. परिणामी अंधेरी, जोगेश्वरी, जुहू आणि इतर भागातील नागरिकांना जवळपास पाच दिवस पाणीपुरवठा झाला नाही. ही बाब लक्षात घेता पर्यायी व्यवस्था आवश्यक आहे, असे पालिकेने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed