• Mon. Nov 25th, 2024

    चोरायला बाळासाहेब वस्तू नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

    चोरायला बाळासाहेब वस्तू नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

    म.टा.प्रतिनिधी, नागपूर : ‘लहान मुलांचे खेळणे दिसले नाही तर ते लगेच ‘माझे खेळणे चोरीला गेले’ असे ओरडत फिरत असतात. त्याचप्रमाणे काही लोक ‘आमचा पक्ष चोरला, आमचा बाप चोरला’ असे सतत ओरडत बसतात. अरे, चोरायला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे काय वस्तू आहेत का’, असा घणाघाती सवाल करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली.

    रामटेक येथे रविवारी शिवसंकल्प अभियानांतर्गत सभा झाली. त्यासाठी मुख्यमंत्री शिंदे रामटेक येथे आले होते. कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. व्यासपीठावर रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, आमदार आशिष जयस्वाल, संपर्कप्रमुख डॉ. दीपक सावंत, किरण पांडव, संदीप इटकेलवार उपस्थित होते.

    ‘एकीकडे आम्ही हिंदुत्वाचे पुरस्कर्ते असे सांगायचे, आणि दुसरीकडे जे हिंदुत्वाचे विरोधक आहेत त्यांच्याच मांडीला मांडी लावून सत्तेत बसायचे, हे बाळासाहेबांना कधीच मान्य नव्हते. म्हणूनच त्यांना घरी बसावे लागले’, असेही शिंदे यावेळी म्हणाले. ‘अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर राममंदिर प्रत्यक्षात येण्याचे स्वप्न साकार झाले. ज्यांनी रामाच्या अस्तित्वावर प्रश्न उपस्थित केले, त्यांना घरी बसावे लागले’, असेही त्यांनी नमूद केले.

    निखिल वागळेंची गाडी फोडली नाही, चांगलं चोपलं त्याला; अशी कामं केली की असंच होतं : नारायण राणे

    ठाकरे यांच्या कार्यशैलीवर टीका करताना शिंदे म्हणाले, ‘हा मुख्यमंत्री घरात बसून काम करणारा नाही, फेसबुक लाइव्ह करणारा नाही, तर शेतकऱ्यांमध्ये जाऊन, त्यांची भेट घेऊन, जनतेमध्ये मिसळणारा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे जनतेने घरी बसणाऱ्यांना कायमचे घरी बसवावे. राज्याची चौफेर प्रगती या सरकारकडून सुरू आहे. राज्याचा मतदार सूज्ञ आहे. माझ्यावर किती आरोप केले, तरी मी आरोपाने नाही, तर कामाने उत्तर देईल. त्यामुळे जनतेने साथ द्यावी.’ यावेळी कृपाल तुमाने, आशिष जयस्वाल यांचीही भाषणे झाली.

    शिवसैनिकांनो, सज्ज राहा!

    शिवसंकल्प अभियानाबद्दल बोलताना शिंदे म्हणाले, ‘या अभियानाच्या माध्यमातून बाळासाहेबांनी दिलेले विचार अधिक सक्षमपणे सर्वत्र पोहोचवायचे आहेत. इतकेच नव्हे, तर राज्याचा विकास व इतर अनेक चांगली कामे जनतेपर्यंत पोहोचवत राज्याला अधिक भक्कम करायचे आहे.’ रामटेकवर पुन्हा एकदा भगवा फडकावण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, अशी भावनिक सादही यावेळी शिंदे यांनी उपस्थितांना घातली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed