महाविकास आघाडीच्या संभाव्य जागा वाटपात अहमदनगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाला तर शिर्डीची जागा शिवसेनेला राहील, अशी अटकळ होती. त्या दृष्टीने पक्ष आणि इच्छुक उमेदवारांचीही चाचपणी सुरू आहे. मधल्या काळात खासदार राऊत यांचे दोन वेळा नगरला दौरे झाले, त्यांनी या दोन्ही जागा लढविण्यास शिवसेना तयार असल्याचे तसेच आमच्याकडे उमेदवारही असल्याचे सांगितले. त्यानंतर काँग्रेसनेही शिर्डीच्या जागेवर दावा केला आहे. नगरची नको पण शिर्डीची जागा आम्हाला द्या, अशी काँग्रेसची मागणी आहे.
नव्याने महाविकास आघाडीसोबत येण्याच्या प्रक्रियेत असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडूनही शिर्डीच्या जागेवर दावा केला जाऊ लागला आहे. शिवसेनेने आता त्या पुढे पाऊल टाकले असून थेट ठाकरे यांचे मेळावे दोन्ही मतदारसंघात आयोजित केले आहेत. त्यानुसार उद्धव ठाकरे १३ व १४ फेब्रुवारीला नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. नगर आणि शिर्डी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत त्यांचे कार्यक्रम होणार आहेत. १३ फेब्रुवारीला शनिशिंगणापूर येथे शनी दर्शन आणि त्यानंतर आमदार शंकरराव गडाख यांनी सोनईत आयोजित केलेला संवाद मेळावा होईल. त्यानंतर राहुरी बाजार समितीमध्ये कार्यक्रम आणि श्रीरामपूर तसेच राहाता येथील मेळावा होणार आहे. त्या दिवशी ठाकरे यांचा शिर्डीत मुक्काम असून १४ फेब्रुवारीला कोपरगाव, संगमनेर व अकोले येथील संवाद मेळावा घेऊन ठाकरे सायंकाळी शिर्डी येथून विमानाने मुंबईला रवाना होतील.
शिवसेनेत शिर्डीसाठी अनेक उमेदवार इच्छूक होते. त्यापैकी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे नाव निश्चित झाल्याचे सांगण्यात येते. मात्र, त्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. मधल्या काळात शिवसेनेत (ठाकरे गट) प्रवेश केलेले रिपब्लिकन नेते अशोक गायकवाड यांचाही शिर्डीच्या जागेवर दावा आहे. तर नगर लोकसभा मतदारसंघातून माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे नाव पुढे करण्यात येत आहे.
गडाख यांचा नेवासा मतदारसंघ नगर नव्हे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात येतो. दुसऱ्या बाजूला गडाख विधानसभेचे गणित लक्षात घेऊन भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. शिर्डीतील पक्षाच्या उमेदवारीचा तिढाही सुटलेला नाही.