• Thu. Nov 14th, 2024

    आदिवासींच्या २५ जागा ठरणार निर्णायक! मविआ-महायुतीत रस्सीखेच, लोकसभेत १७ जागा ठरल्या महत्त्वपूर्ण

    आदिवासींच्या २५ जागा ठरणार निर्णायक! मविआ-महायुतीत रस्सीखेच, लोकसभेत १७ जागा ठरल्या महत्त्वपूर्ण

    Maharashtra Assembly Election 2024: आदिवासी समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिला आहे. परंतु, २०१४ पासून काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासींनी भाजपची साथ धरली. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीत आदिवासी मतदार काँग्रेसकडे परतल्याचे चित्र आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    vote AI 2

    नाशिक : राज्यातील आगामी सत्ता समीकरणात अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव असलेल्या २५ जागा निर्णायक ठरणार असल्याने, येथे वर्चस्व मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत या २५ पैकी १७ जागांवर मविआला मताधिक्य मिळाल्याने, महायुतीसमोर गेल्या वेळेच्या १७ जागा राखण्याचे आव्हान आहे. राज्यघटना बदलण्याची भीती आदिवासींमध्ये कायम असताना, धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याचा प्रचार विरोधकांनी केल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे काँग्रेसचा हा पारंपरिक मतदार विधानसभेतही मविआकडे जातो का, याकडे लक्ष आहे.

    राज्यात आदिवासी समाज एकूण लोकसंख्येच्या साडेनऊ टक्के आहे. ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अमरावती, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, अहिल्यानगर या भागांत आदिवासी लोकसंख्या अधिक आहे. राज्यात आदिवासी समाजाचे लोकसभेत चार खासदार आणि विधानसभेत २५ आमदार आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तासमीकरणात आदिवासींची भूमिका निर्णायक राहिली आहे. आदिवासी समाज हा काँग्रेसचा पारंपरिक मतदार राहिला आहे. परंतु, २०१४ पासून काँग्रेसची जागा भाजपने घेतली आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये आदिवासींनी भाजपची साथ धरली. परंतु, गेल्या लोकसभा निवडणुकीत आदिवासी मतदार काँग्रेसकडे परतल्याचे चित्र आहे.

    लोकसभा निवडणुकीत चार राखीव जागांपैकी तीन जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवला. त्यात नंदुरबार, गडचिरोली-चिमूर जागेवर काँग्रेसने, तर दिंडोरीत राष्ट्रवादी शप पक्षाने विजय मिळवला. तर पालघरची जागा भाजपने जिंकली होती. या निवडणुकीत आदिवासी आमदार असलेल्या २५ जागांपैकी १७ जागांवर महाविकास आघाडीला, तर अवघ्या आठ ठिकाणी महायुतीला मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीची धाकधूक वाढली आहे.

    धनगर आरक्षणाचा प्रभावी प्रचार
    आदिवासींसाठी राखीव असलेल्या २५ जागांसोबतच, राज्यातील ३८ विधानसभा मतदारसंघांत आदिवासी मतदारांचे प्रमाण १० ते १५ टक्के असून, त्यांचा या मतदारसंघांवर प्रभाव आहे. धनगर समाजाला आदिवासींमध्ये आरक्षण देण्याचा मुद्दा तापण्याची चिन्हे आहेत. विरोधकांकडून धनगरांना आदिवासींमध्ये आरक्षण दिले जाणार असल्याचा प्रचार केला जात असल्याने महायुतीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.
    Amit Shah: मुस्लिमांना आरक्षण मिळू देणार नाही; अमित शहा यांची भूमिका, ‘मविआ’वर तुष्टीकरणाचा आरोप
    या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
    महायुतीकडून या निवडणुकीत भाजपचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्यासह विधानसभेचे उपाध्यक्ष व राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार नरहरी झिरवाळ, मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची, तर काँग्रेसमध्ये माजी मंत्री के. सी. पाडवी यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. नंदुरबारमध्ये डॉ. गावित यांच्या विरोधात मित्रपक्ष शिवसेनेनेच (शिंदे) आघाडी उघडल्याने डॉ. गावित यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. अत्राम यांच्यासमोर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून त्यांच्या कन्येने आव्हान उभे केले आहे.

    एसटी राखीव मतदारसंघ
    नंदुरबार, नवापूर, अक्कलकुवा, शहादा, तळोदा, चोपडा, दिंडोरी, इगतपुरी, बागलाण, कळवण, साक्री, शिरपूर, मेळघाट, आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी, राळेगाव, आर्णी, डहाणू, विक्रमगड, पालघर, भोईसर, भिवंडी ग्रामीण, शहापूर, अकोले, आदी.
    प्रेमसंबंधातून बॉडीचे सात तुकडे, गोराईतील मृत्यूचं गूढ टॅटूमुळे उकललं, जीव घेण्यामागे धक्कादायक कारण
    सन २०१९ चे चित्र
    भाजप ८
    राष्ट्रवादी (एपी) ६
    काँग्रेस ४
    शिवसेना शिंदे गट ३
    छोटे पक्ष ४

    लढत असलेल्या जागा
    महायुती
    भाजप ११
    शिंदे सेना ६
    अजित पवार गट ८

    महाविकास आघाडी –
    काँग्रेस १०
    शरद पवार गट ८
    उबाठा ७

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed