कोट्यावधी रुपयांची उलाढाल आणि कर्मचाऱ्यांची कामधेनू असलेल्या शिर्डीतील साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को – ऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीत पहिल्या दिवसापासून रंगत दिसून आली. १७ जागांसाठी ५३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. निवडणुकीत विखे समर्थकांच्या महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पुरस्कृत साई हनुमान पॅनल, खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या साई जनसेवा पॅनल विरोधात कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने तगडे आव्हान उभे केले होते. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या निवडणुकीकडे लागलं होतं. यासाठी आज ११ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पाडली असून ९७% मतदान झाले आणि लगेचच मतमोजणी झाली. यामध्ये १७-० फरकाने कामगार नेते विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पुरस्कृत दोन्ही पॅनलचा पराभव करत सोसायटीची सत्ता खेचून आणली. निवडणुकीच्या वेळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोट्यावधीची उलाढाल
१६६६ सभासद आणि साईबाबा सोसायटीचे २०० कर्मचारी संख्या असलेल्या साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीची वार्षिक उलाढाल जवळपास १५० कोटी रूपये आहे, तर वार्षिक नफा चार कोटी रुपयांपर्यंत असून ७५ कोटी रूपयांच्या ठेवी आहेत.
गणेश कारखानानंतर विखेंना दुसरा झटका
काही महिन्यांपूर्वी झालेल्या राहाता तालुक्यातील गणेश कारखाना निवडणुकीत विखे पाटलांना पराभव पाहावा लागलाय. त्यानंतर पुन्हा एकदा शिर्डीतील साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी निवडणुकीत विखे विरोधात पॅनल उभा ठाकल्याने महसुलमंत्री सत्ता राखणार का? याकडे सर्वांच लक्ष लागल होतं. मात्र, थोरात-कोल्हे पुरस्कृत विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलने विखे पुरस्कृत पॅनलला पराभवाची धूळ चारत विखे पाटलांना शिर्डीत दुसरा धक्का दिला आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थेचे दुय्यम निबंधक रावसाहेब खेडकर यांनी कामकाज बघितले. तर साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संस्थेचे सचिव नबाजी डांगे यांनी काम पाहिले.
विवेक कोल्हेंची परद्यामागून कमाल
गणेशनगर कारखाना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि भाजपचे विवेक कोल्हे यांनी एकत्र येत ताब्यात घेतला होता. त्यानंतर साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटीत विठ्ठल पवार यांच्या परिवर्तन पॅनलला विवेक कोल्हे यांनी पडद्यामागून बळ दिलां. मात्र, विजय मिरवणुकीत जल्लोष करण्यासाठी भाजपचे विवेक कोल्हे थेट मतमोजणी केंद्रावर पोहचल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या यावेळी कोल्हे यांनी कार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा केला.
कोणाचा विजय झाला
कांदळकर महादू बाप,आरणे कृष्णा नाथा, कोकाटे भाऊसाहेब चांगदेव, तुरकने संभाजी शिवाजी, जगताप देविदास विश्वनाथ, कोते पोपट भास्कर, कोते विनोद गोवर्धन, दुनबळे मिलिंद यशवंत, पवार तुळशीराम रावसाहेब, गायकवाड रवींद्र बाबू, लवांडे भाऊसाहेब लक्ष्मण, तांबोळी इकबाल फकीर महंमद, अहिरे गणेश अशोक, जगताप सुनंदा किसन, बारसे लता मधुकर, पवार विठ्ठल तुकाराम
हा दहशतीविरुद्ध उठवलेला आवाजाचा विजय
१७-० ने विठ्ठल पवार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा दणदणीत विजय झालाय. त्याबद्दल मी सर्व विजय उमेदवारांचे अभिनंदन करतो आणि सर्व सभासदांचे आभार मानतो. हा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांचा विजय आहे. हा दहशतीविरुद्ध आणि अन्यायाविरुद्ध उठवलेल्या आवाजाचा विजय आहे. हा दडपशाही करून ५९८ लोकांवर अन्याय करणाऱ्यांच्या विरोधात उठाव झाल्याचा विजय आहे, अशी प्रतिक्रिया युवा नेते विवेक कोल्हे यांनी विजयानंतर दिली आहे.
निकालानंतर विठ्ठल पवारांची प्रतिक्रिया
साईबाबांच्या आशीर्वादामुळे आणि साई संस्थान मधील सर्वच कामगारांच्या पाठिंब्यामुळे विजय शक्य झाला असून माझ्या मित्रपरिवार आणि ज्ञात अज्ञात अदृश्य शक्तींनी मला साथ दिली त्यामुळे विजय मिळालाय.आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष करतोय आणि संघर्षाची पावती म्हणून सर्व कामगारांनी आमच्यावर जबाबदारी टाकली. देशातील दुसऱ्या क्रमांकाच्या देवस्थानची संस्था असल्याने भविष्यात आम्हाला ते पुढे नेण्यासाठी काम करावे लागेल. आगामी काळात सर्वांना सोबत घेऊन संस्थेच्या प्रगतीसाठी काम करेल, अशी प्रतिक्रिया परिवर्तन पॅनलचे नेते विठ्ठल पवार यांनी दिली आहे.
गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा
परिवर्तन पॅनलच्या विजयानंतर सर्व विजय उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण करत डीजेच्या तालावर ठेका धरत फटाक्यांची आतिषबाजी करत आणि जोरदार घोषणा देत विजयाचा जल्लोष साजरा केला आहे.