गोळ्या त्या गुंडानं मारल्या की दुसऱ्या कुणी मारल्या,हाच प्रश्न माझ्या मनात आहे. पूर्वीचे राज्यपाल खूप कर्तव्यदक्ष होते, त्यांच्याच सोबत त्या गुंडाचा फोटो समोर आला आहे. त्यामुळं राज्यपालांकडे आम्ही जाणार नाही. गणपती विसर्जन मिरवणुकीत एका आमदारानं गोळीबार केला त्याच्यावर कारवाई झाली नाही. दहिसर भागातील आमदाराच्या मुलानं बिल्डरच्या मुलाचं अपहरण केलं होतं, त्याच्यावर कारवाई झाली नाही. काल पुण्यात निखील वागळे, असीम सरोदे आणि विश्वंभर चौधरी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. भाजपच्या गुंडांनी त्यांना धमकी दिली होती, पोलिसांनी त्यांना अडवून ठेवलं होतं. पोलिसांनी काही कारवाई केली नाही. पोलीस महासंचालिका रश्मी शुक्ला यांनी जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. महाराष्ट्राच्या पोलीस प्रमुखांनी जनतेला पत्र लिहिलं असेल असं वाटत नाही, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीसांना यापूर्वी फडतूस, कलंक बोललो पण आता त्यांच्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. राज्याला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय का असं वाटावं, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असेल तर मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. एक हत्या होत असताना तुम्ही त्याची बरोबरी श्वानाबरोबर करता, असा सवाल ठाकरेंनी केला. मी स्वत: मुख्यमंत्री होतो, जेव्हा जेव्हा पोलिसांवर आरोप झाले तेव्हा महाराष्ट्र पोलिसांसोबत उभे राहिलो, असं ठाकरे म्हणाले.
राज्यात राष्ट्रपती राजवट लावा, निवडणूक घ्या
आम्ही तुमच्या माध्यमातून सरकारच्या बरखास्तीची मागणी करतोय, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा आणि निवडणुका घ्याव्यात, सुप्रीम कोर्टानं आम्हाला न्याय द्यावा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. न्यायालय हे न्यायालय राहिलं पाहिजे झापालंय झालं नाही पाहिजे, जनतेला न्याय द्यावा, सर्वोच्च न्यायालय आम्हाला न्याय देईल, अशी आशा आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जनतेच्या न्यायालयातील कौल आम्हाला मान्य असेल, असं ठाकरे म्हणाले.
करोना काळात महाराष्ट्राच्या जनतेनं माझं कुटुंबप्रमुख जे सांगितलं ते ऐकलं. आता महाराष्ट्रातील मतदार माझं मत ऐकतील आणि साथ देतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.