• Sat. Mar 7th, 2026

    एसटी बस स्थानक विकासासाठी गरजेनुसार जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Mar 6, 2026
    एसटी बस स्थानक विकासासाठी गरजेनुसार जिल्हा नियोजनमधून निधीची तरतूद करावी – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे – महासंवाद

    मुंबई, दि. ०६ : अमरावती व नागपूर विभागातील एसटी बस स्थानकांचा विकास करताना प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा तातडीने करण्यात याव्यात. एसटी बस स्थानक विकासासाठी आवश्यकता असल्यास जिल्हा नियोजन समितीतून निधी तरतूद करण्यात येईल, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

    विधिमंडळ येथील महसूल मंत्री यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी मंत्री बावनकुळे बोलत होते. बैठकीला परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, एमएसआरटीसी (MSRTC) चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर, स्थापत्य महाव्यवस्थापक दिनेश महाजन यासह महसूल व वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

    मंत्री बावनकुळे म्हणाले, कामठी व मोहदा येथील येथे एसटी बस स्थानकांचा विकास खासगी सार्वजनिक भागीदारी तत्त्वावर (पीपीपी) माध्यमातून केला जावा. मोहदा येथील बस स्थानकाच्या विकासासाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात येईल. अमरावती व नागपूर विभागातील बस स्थानकांच्या ठिकाणी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर कुलर ठेवले जावे. गणेश पेठ येथील एसटी बस स्थानकाच्या ठिकाणी प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा तयार केल्या जाव्यात. प्रवासी प्रतीक्षालयातील खुर्च्या, डॉर्मेमेंटरी, हिरकणी कक्ष यांची कामे केली जावी.

    परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी बस सेवा सक्षम करण्यासाठी नागपूर विभागात 100 नवीन एसटी बसेस तसेच अमरावती विभागात 65 नवीन एसटी बसेस लवकरच दिल्या जातील. विविध ठिकाणी प्रवासी बस थांबे उभारण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल. नागपूरच्या नियोजित शहर बससेवेसाठी एसटी महामंडळ आणि नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एनएमआरडी) यांनी समन्वय साधण्यात यावा.

    नागपूर व अमरावती विभागातील नरखेड, हिंगणा, रामटेक, उमरेड, काटोल, कोंढाळी, कामठी, गणेश पेठ यासह विविध एसटी बस स्थानक विकसित करणे आणि यासाठी उपाययोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

    ०००

    किरण वाघ/विसंअ

     

     

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed