सकल मराठा समाजाच्या वतीने श्रीगोंदा तालुक्यातील औटेवाडी येथे त्यांची सभा झाली. सभेला नेहमीप्रमाणे मोठी गर्दी झाली होती. यावेळी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, आपल्या मुंबईतील मोर्चानंतर राज्य सरकारने जी अधिसूचना काढली आहे, त्याचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत व मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आपण शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार आहोत. यासाठीच शनिवारपासून (१० फेब्रुवारी) पुन्हा उपोषणाची सुरवात करणार आहे. येत्या दोन दिवसात अधिवेशन बोलावून त्याचे कायद्यात रूपांतर करा. त्याचा अहवाल न्यायालयात ठेवा, अशी आपली मागणी आहे. मराठा आरक्षणाची सुरुवात आण्णासाहेब पाटील यांनी केली होती. पंरतु काहींनी ती मोडीत काढली. मराठे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईला गेले आणि शांततेत आरक्षण घेऊन आले. त्यानंतर आता मी रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आलो आहे. आता आरक्षणाची लढाई टोकाची होणार आहे. मी असेन नसेन माहीत नाही, माझे विचार आणि माझी जात फुटू देऊ नका, असे भावनिक आवाहन जरांगे पाटील यांनी सभेत केले.
यासभेत जरांगे पाटील यांनी भुजबळ यांचे नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, आता टोळीचा मुकादम सावध झाला आहे. आतापर्यंत टोळीच्या या मुकादमाने पडद्या आडून तीन वेळा मराठ्यांचे आरक्षण घालविले आहे. तुला अक्कल असती तर जेलमध्ये कांदे खायला गेला नसता. आरक्षण मिळू दे मग झटका दाखवतो, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला.
मुंबईतील मोर्चानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मोर्चाच्या यशावर शंका उपस्थित केली होती. त्यांच्यावरही नाव न घेता जरांगे पाटील यांनी टीका केली. ते म्हणाले, काही लोक सांगतात की जरांगे यांच्या उपोषणाने मोर्चाने मराठ्यांना नेमकं काय मिळाले असे म्हणतात. त्यांना मी सांगू इच्छितो की गल्लीबोळात बडबड करणाऱ्या नेत्यांना काय माहिती आरक्षणाचा अध्यादेश निघाला आहे. त्याचे लवकरच कायद्यात रूपांतर होणार आहे, असे जरांगे पाटील यांनी ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले. सभा संपल्यानंतर ते रात्रीच अंतरवाली सराटीकडे रवाना झाले.