निखिल वागळे यांची पुण्यात आज निर्भय बनो सभा
पुण्यातील दांडेकर पुलानजीक राष्ट्र सेवा दल येथील हॉलमध्ये आज निर्भय सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेमध्ये ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचे प्रमुख भाषण आहे. त्यांच्याबरोबर अॅड. असीम सरोदे आणि समाजवादी नेते नितीन वैद्य यांचीही भाषणे होणार आहेत. मात्र, वागळे यांची सभा झाली तर कायदा सुव्यवस्था बिघडेल, त्यामुळे त्यांची ही सभा होऊ देणार नाही, असा इशारा भाजपने दिला होता.
हल्ल्यानंतरही वागळे सभास्थळी
गाडीवर हल्ला झाल्यानंतरही निखिल वागळे कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहे. कार्यक्रमस्थळी परिवर्तनवादी कार्यकर्त्यांनी त्यांचे दणक्यात स्वागत केलंय. निखिल वागळे यांची मंचावर एन्ट्री होताच फुले शाहू आंबेडकरांच्या गगनभेदी घोषणांनी सभास्थळ दणाणून गेलं. काहीही होऊ द्यात आपण सभा घेऊ, असा निर्धार वागळे यांनी बोलून दाखवल्यानंतर जमलेल्या गर्दीने घोषणा देऊन वागळे यांना तुफान प्रतिसाद दिला.
पोलिसांचा प्रचंड फौजफाटा तरीही वागळे यांच्यावर हल्ला
निखिल वागळे यांची सायंकाळी ६ वाजता नियोजित सभा होती. परंतु ही सभा होऊ नये, यासाठी भाजपचा तीव्र विरोध होता. निखिल वागळे जेव्हा सभास्थळी जायला निघाले, त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी पोलीसही होते. परंतु पोलिसांची सुरक्षा असतानाही भाजप कार्यकर्त्यांनी वागळे यांच्या गाडीला दगडांनी लक्ष्य केल्याने पुण्यातील परिवर्तवादी कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
गृहमंत्री फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, कार्यकर्ते आक्रमक
दरम्यान निखिल वागळेंच्या गाडीवर हल्ला केल्यानंतर पुण्यात वातावरण तापले आहे. हल्ला करणाऱ्यांमध्ये फक्त भाजप कार्यकर्ते नसून अजित पवार गटाचे कार्यकर्तेही उपस्थित होते, असा दावा तेथील महिलांकडून करण्यात आला आहे. यानंतर महिलांनाही मारहाण करण्यात आल्याचे सांगितले आहे. तसेच आता या घटनेनंतर देवेंद्र फडणवीसांकडे राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे.