जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट उघडण्यासाठी खोलो खोलो…गेट खोलो…घोषणा देत गेटच्या दिशेने हातातील पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या. काही बहाद्दर पुरुष व महिला वकील तर चक्क गेटवर चढून पलीकडे उतरण्याच्या प्रयत्नात होते. एवढा गोंधळ होऊनही पोलिसांनी मात्र गेट उघडलेच नाही व अखेर आमदार संग्राम जगताप यांच्या मध्यस्थीने निवडक वकिलांचे शिष्टमंडळ मागण्यांचे निवेदन घेऊन जिल्हाधिकार्यांना भेटण्यास गेले.
राहुरीत निर्घृण खून झालेल्या राजाराम व मनीषा आढाव वकील दाम्पत्याच्या कुटुंबियांना न्याय द्यावा, आरोपींविरुद्ध मोक्काअन्वये कारवाई करावी, वकील संरक्षण कायदा लागू करावा या मागणीसाठी जिल्ह्यातील वकिलांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या कार्यालयाचे मुख्य गेट बंद असल्याने वकील आक्रमक झाले. महिला वकिलांसह अनेक वकील गेटवर चढले व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने बाटल्या फेकल्या. या मोर्चामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप सहभागी होते. हा प्रकार पाहून तेही अचंबित झाले.
कार्यालयाच्या गेटवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. बंदोबस्त तैनात होता मात्र, पोलिस अल्प संख्येने होते. सर्व वकिलांना जिल्हाधिकारी कार्यालयात जायचे होते व त्यासाठी ते आक्रमक झाले होते. काहींनी गेटच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या, महिला वकिलांसह अनेकजण गेटवर चढले व त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. हे पाहिल्यावरही पोलिसांनी गेट उघडले नाही. मात्र, नंतर प्रत्येक तालुक्यातील वकील संघटनांच्या निवडक पदाधिकार्यांना प्रवेश दिला व त्यांनी आ. जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांची भेट घेतली. जिल्हाधिकार्यांना निवेदन दिल्यावर वातावरण शांत झाले. आमदार सत्यजित तांबे यांनीही नंतर मोर्चेकरी वकिलांची भेट घेतली.
महाराष्ट्रात वकील संरक्षण कायदा करावा, राहुरीतील गुन्ह्याचा खटला जलदगती न्यायालय पुढे चालावा, खटला चालवण्यासाठी सरकारतर्फे उज्वल निकम यांची नियुक्ती करावी अशाही मागण्या मोर्चेकरी वकिलांनी यावेळी केल्या.