• Sat. Sep 21st, 2024

साद देती नवी हिमशिखरे: पाकव्याप्त काश्मीरपासून हाकेच्या अंतरावर नवे पर्यटन ठिकाण

साद देती नवी हिमशिखरे: पाकव्याप्त काश्मीरपासून हाकेच्या अंतरावर नवे पर्यटन ठिकाण

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

देशाचे नंदनवन म्हणून ओळख असलेल्या काश्मीरचे पर्यटन आत्तापर्यंत श्रीनगर व आजूबाजूच्या खोऱ्यापर्यंत मर्यादित होते. मात्र घटनेतील कलम ३७० हटवल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत आता हाकेच्या अंतरावर असलेल्या पाकव्याप्त भागापर्यंत नवे पर्यटन ठिकाण सुरू झाले आहे. वांद्रे कुर्ला संकुल परिसरात सुरू असलेल्या ओटीएम पर्यटन प्रदर्शनात काश्मीर पर्यटनाशी संबंधित असणाऱ्या सूत्रांकडून ‘महाराष्ट्र टाइम्स’ला ही माहिती मिळाली.

या प्रदर्शनात विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश व पर्यटन व्यवस्थापक सहभागी झाले आहेत. त्यामध्येच काश्मीर पर्यटन विभागाचादेखील विशेष स्टॉल आहे. काश्मिरातील पर्यटन व्यवस्थापक त्यात सहभागी झाले आहेत. त्यांच्याशी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने यानिमित्ताने संवाद साधला असता अनेक नवीन पर्यटन ठिकाणे सुरू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

याबाबत फाइन फेअर या पर्यटन व्यवस्थापक कंपनीचे व्यवस्थापकीय भागीदार आदिल अहमद यांनी माहिती दिली. ‘काश्मिरात सर्वत्र पर्यटनभिमूख नैसर्गिक सौंदर्य लाभलेली ठिकाणे याआधीदेखील होती. मात्र खोऱ्यातील अशांत स्थिती, सततची आंदोलने, संचारबंदीची स्थिती यामुळे पर्यटकांना श्रीनगरपासून फार दूर नेले जात नव्हते. आता मात्र संचारबंदी, आंदोलने थांबली आहेत. सकारात्मक वातावरण खोऱ्यासह सर्वत्र पसरले आहे. त्यामुळेच आजवर अनोळखी असलेल्या किंवा काश्मिरच्या मुख्य भूमिपासून दूर असलेल्या ठिकाणांपर्यंत पर्यटकांना नेले जात आहे. केवळ काही ठिकाणी सुरक्षा व्यवस्था कडक असल्याने तपासणीसाठी अधिक वेळ देण्याचे सहकार्य पर्यटकांनी करणे अपेक्षित आहे,’ असे ते म्हणाले.

आदिल अहमद यांनी अनोळखी ठिकाणांबाबत केलेल्या उल्लेखापैकी सर्वाधिक चर्चेतील पर्यटन ठिकाण हे केरण सेक्टरमधील आहे. श्रीनगरपासून १४४ किमी व साडेचार तासांच्या अंतरावर वायव्येकडे हे ठिकाण आहे. तेथील नीलम नदी ही नियंत्रण रेषेवरून धावते. त्यामुळे या नदीनेच काश्मीर खोरे व पाकव्याप्त काश्मीर वेगळे केले आहे. या ठिकाणी नदीच्या किनारी गेल्यानंतर पलीकडे ‘केरण सेक्टर पाकिस्तान पर्यटन’ असा फलक स्पष्ट दिसतो. हाकेच्या अंतरावर दोन्ही देशांचे पर्यटक शांततेत समोरासमोर येत आहेत. मात्र या ठिकाणी एका दिवसात जाऊन येणे शक्य नसून एक दिवसाचा थांबा घ्यावा लागतो, असे अहमद यांनी स्पष्ट केले.

कुपवाड्यातही अनेक ठिकाणे

याप्रमाणेच कुपवाड्यातील लोलाब व्हॅली, वेहरान व्हॅली, केल, मच्छल, शाउंटर अशी काही दुर्गम व हिमालयाने सजलेली नैसर्गिक सौंदर्याची ठिकाणे कलम ३७० हटवल्यानंतर बदललेल्या व सकारात्मक झालेल्या पर्यटकांसाठी टप्प्याटप्प्याने सुरक्षेच्या उपायांसह केंद्र सरकारकडून सुरू होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed