प्रवीण भगवान अंभोरे (वय २८), प्रतिक्षा भगवान अंभोरे (वय २२), प्रदीप उर्फ लखन भगवान अंभोरे (वय २० सर्व रा. आकोली ता. जिंतूर) अशी मृत भाऊ-बहिणींची नावं आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिभा अंभोरेची एमआयडीसीच्या मैदानावर वनविभागासाठी शारिरीक चाचणी होती. शारिरीक चाचणी देऊन हे तिघेजण दुचाकीवरून येत होते. पाटीलवाडा हॉटेल समोर पाठीमागून हायवाने कट मारल्यामुळे तिघेजण हायवाखाली आले आणि त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
हायवा चालक अपघात घडताच तेथून पसार झाला. याची माहिती तेथील हॉटेल चालकांनी चिकलठाणा पोलिसांना दिली. तिघे भावंडं हे बीडबायपास येथे भाड्याने राहत होते. प्रवीण हा एका दुकानावर काम करत होता. तर प्रदीप हा शिक्षण घेत होता तर प्रतिभाने वनविभागात नोकरीसाठी एमआयडीसीच्या मैदानावर आज शारिरीक चाचणी दिली होती, अशी माहिती चिकलठाणा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रविकिरण दरवडे यांनी दिली. याचा तपास एएसआय मदन नागरगोजे हे करत आहेत.
ती इच्छा राहिली अपुरी…
प्रतिभा अंभोरेला नोकरी लागावी अशी कुटुंबीयांची इच्छा होतो. आज वनविभागासाठी शारिरीक चाचणी असल्याने ते सकाळी शारिरीक चाचणीसाठी गेले होते. चाचणी देऊन प्रतिभा दोन्ही भावंडासोबत दुचाकीने एमआयडीसीच्या मैदानावरून आपल्या रुमवर परत येत होती. मात्र, पाठीमागून येणाऱ्या हायवाच्या खाली येऊन त्यांचा मृत्यू झाला आणि सारी स्वप्न अधुरी राहिली. यामुळे नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्या प्रतिभाच्या आयुष्यावर काळाने घाला घातला सोबतच तिच्या दोन भावंडांना देखील मृत्यूने कवटाळले. ही बातमी कळताच त्यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. तिन्ही पोरांना नियतीने हिरावून नेलं हे कळल्यापासून त्यांच्या आईच्या डोळ्यातील आसवं थांबत नाहीयेत.