मुंबईच्या या विमानतळावरून ११ नोव्हेंबरला २४ तासांत सर्वाधिक एक हजार ३२ विमानोड्डाणे झाली. हा आकडा मागील वर्षीच्या मध्यापर्यंत सरासरी ९०० होता. तो आता सध्या सरासरी एक हजारांच्या घरात गेला आहे. सध्या या विमानतळावरून ताशी सरासरी ४२ ते ४५ विमानांची ये-जा होत आहे. हा आकडा २०२३च्या मध्यापर्यंत सरासरी ३६ ते ३८ होता. अशाप्रकारे विमानांची संख्या वाढती असल्यानेच विशेष (चार्टर) विमानांना ये-जा करण्यावरील बंधने आणखी कडक करण्यात आली आहेत.
यासंबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशाप्रकारे विशेष विमानांच्या ये-जा करण्यावरील निर्बंधांना ‘संचारबंदी’ संबोधले जाते. मुंबई विमानतळावर संचारबंदीचा हा कालावधी याआधी चार तासांचा होता. आता मात्र तो आठ तासांचा करण्यात आला आहे. त्यानुसार आता सकाळी ८ ते ११, सायंकाळी ५ ते ८ व रात्री ९.१५ ते ११.१५दरम्यान कुठलेही वेळापत्रकाबाहेरील विशेष विमान धावपट्टीवर उतरू शकणार नाही किंवा उड्डाण घेऊ शकणार नाही. यादरम्यान विशेष व्यक्तींच्या व्हीव्हीआयपी विमानांना मात्र कुठलेही बंधन नसेल.