• Sat. Sep 21st, 2024
मार्डचे संपाचे हत्यार; निवासी डॉक्टरांचे आजपासून बेमुदत आंदोलन, काय आहेत मागण्या?

मुंबई : मानधनवाढ, प्रलंबित भत्ते, वसतिगृहांची स्थिती या प्रलंबित मागण्यांसाठी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करूनही अद्याप पूर्तता न झाल्याने मध्यवर्ती निवासी डॉक्टरांच्या संघटनेने (मार्ड) आज, ७ फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. या संपामध्ये सार्वजनिक रुग्णालयांतील निवासी डॉक्टर सहभागी होणार आहेत. पालिकेच्या रुग्णालयांतील निवासी डॉक्टरांचा यात प्रत्यक्ष सहभाग नसेल. आपत्कालीन परिस्थितीमधील वैद्यकीय सेवेवर याचा परिणाम होणार नाही याकडेही निवासी डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. सरकारचा निवासी डॉक्टरांच्या मागण्यांकडे असलेला दृष्टीकोन अत्यंत उदासीन असून, डॉक्टरांच्या मागण्यांची गांभीर्याने दखल घेतली जात नाही, अशी खंत संघटनेने व्यक्त केली आहे.

सेंट्रल मार्डने यावर्षी तीन जानेवारी रोजी सरकारने आश्वासन दिल्यानंतर संप मागे घेतला. मात्र, तरीही सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत. त्याच मागण्यांसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा कामबंद आंदोलन करावे लागणार आहे. मात्र, या कालावधीत आपत्कालीन वैद्यकीय सुविधा सुरू राहणार आहेत. त्यांच्यावर कोणताही परिणाम होऊ देणार नाही, असे ‘मार्ड’ने स्पष्ट केले आहे. जेजे रुग्णालय प्रशासनाने रुग्णसेवा प्रभावित होणार नाही याची संपूर्ण काळजी घेण्यात येणार आहे.

वसतिगृहांचा प्रश्न प्रलंबित

परराज्याच्या प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामध्ये वसतिगृहांमधील जागा कमी पडत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढली पण निवासाची सुविधा वाढली नाही. राहण्याची सुविधा दयनीय आहे. वसतिगृह सुविधेसाठी यापूर्वीही डॉक्टरांनी सातत्याने मागणी केली आहे. प्रत्येकवेळी सरकार आश्वासन देते. मात्र, पुढे ती कागदावर राहतात. विद्यावेतनासाठीही विद्यार्थ्यांना सातत्याने पाठपुरावा करावा लागतो. त्यामुळे संघटनेतील विद्यार्थी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. संघटनेमधील सदस्यांनी आतापर्यंत २८ वेळा यासंदर्भात पत्रव्यवहार करूनही समस्या कायम आहे.
मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निवासी डॉक्टरांचा संप; ४५० डॉक्टर संपामध्ये होणार सहभागी
प्रमुख मागण्या…

– निवासी डॉक्टरांसाठी पुरेशा प्रमाणात वसतिगृहांची व्यवस्था करण्यात यावी
– विद्यावेतनामध्ये वाढ करा
– विद्यावेतन दरमहा १० तारखेपर्यंत खात्यावर जमा करा
– केंद्रीय संस्थांप्रमाणे विद्यावेतनाप्रमाणे देण्यात यावे
– वरिष्ठ निवासी डॉक्टरांसाठी वसतिगृहाची सुविधा

सरकारकडून पूर्तता नाही

‘मार्ड’चे राज्याध्यक्ष डॉ. अभिजीत हेलगे म्हणाले की, आम्ही मागण्यांसाठी मागील काही महिने सातत्याने प्रयत्न करीत आहोत. मात्र, सातत्याने पाठपुरावा करूनही त्याची सरकारने पूर्तता केलेली नाही. सोमवारी आमची बैठक झाली. मात्र, त्यात केवळ तोंडी आश्वासने देण्यात आली. त्यामुळे संपाच्या मुद्द्यावर कायम असून, संपाच्या काळामध्येही आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू राहतील. राज्यातील सहा हजारांपेक्षा जास्त डॉक्टर या संपामध्ये सहभागी होतील. मात्र, पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी या संपाला पाठिंबा दर्शवला आहे. पालिका रुग्णालयातील वैद्यकीय सेवांवर परिणाम होणार नसल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed