• Sat. Sep 21st, 2024

चला जुन्नरला…बिबट्या पाहायला! सफारीच्या निर्णयाचं जुन्नरवासीयांकडून स्वागत, पर्यटनाचे नवे आकर्षण ठरणार

चला जुन्नरला…बिबट्या पाहायला! सफारीच्या निर्णयाचं जुन्नरवासीयांकडून स्वागत, पर्यटनाचे नवे आकर्षण ठरणार

पुणे : गुजरातची लायन सफारी, मध्य प्रदेशची टायगर सफारीच्या बरोबरीने आता जुन्नर तालुक्यातील बिबट्या सफारी महाराष्ट्राचा मानबिंदू ठरणार आहे. मंत्रिमंडळाने जुन्नरच्या बिबट्या सफारीला मंजुरी दिल्याने जुन्नरवासीयांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. जुन्नर वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या कार्यक्षेत्रात ३५०पेक्षा अधिक बिबट्यांचा संचार आहे. मात्र हे सगळेच बिबटे या सफारीत समाविष्ट होणार नाहीत; परंतु १६ बिबट्यांसाठी हा पथदर्शी प्रकल्प राबविल्यानंतर टप्प्याटप्प्याने त्याची व्याप्ती वाढण्याचे संकेत वन विभागाच्या वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केले आहेत. बिबट्या सफारीसाठी जुन्नर तालुक्यात जनतेने उभारलेले जनआंदोलन, माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह विद्यमान आमदार अतुल बेनके यांनी केलेल्या पाठपुराव्याचे फलित आणि त्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले पाठबळ, यांमुळे आता प्रत्यक्षात हा प्रकल्प साकारला जाणार आहे.

असा असणार प्रकल्प

जुन्नर तालुक्यात बिबट्यांचा उपद्रव असून, त्यामुळे बिबटे नकोच या मानसिकतेला हा प्रकल्प दूर करणार असल्याचे चित्र आहे. रोजगार आणि पर्यटनाला या प्रकल्पामुळे चालना मिळणार आहे. हा प्रकल्प आंबेगव्हाण येथे एकूण ५२ हेक्टरवर (१३५ एकर) उभारला जाईल. त्यातील ३० हेक्टर म्हणजे जवळपास ६० एकर क्षेत्रात प्रत्यक्ष सफारी उभारली जाणार आहे. त्यामध्ये बाहेरील भाग(आऊटर झोन), मधला भाग (बफर झोन) आणि आतला भाग (कोअर झोन) अशी रचना असेल. बाहेरील बाजूला १० फूट उंचीच्या भिंतीचे कुंपण, त्यावर सौरउर्जेवर आधारीत कुंपण केले जाणार आहे. जेणेकरून आतले बिबटे बाहेर जाऊ शकणार नाहीत. पर्यटक सफारी पहायला आल्यानंतर आतील म्हणजे बफर झोनमध्ये प्रवेश करतील, याच भागात बिबट्यांसाठी पशुवैद्यकीय दवाखाना, पर्यटकांसाठी कॅफेटेरिया असेल. त्यानंतर आतील (कोअर) झोनमध्ये दोन प्रवेशद्वारांमधून पर्यटक इलेक्ट्रीक बसच्या माध्यमातून प्रवेश करतील. पहिल्या प्रवेशद्वारातून बस आत आल्यानंतर दुसरे प्रवेशद्वार उघडेल; त्यापूर्वी पहिले प्रवेशद्वार बंद करण्याची प्रणाली असणार आहे. यामुळे आतील बिबटे बाहेर जाऊ शकणार नाहीत. अंतर्गत भागात बिबट्यांसाठी निसर्गात फिरण्याची सुविधा केली जाणार आहे, तर पर्यटकांच्या बस फिरण्यासाठी अडीच किलोमीटरच्या रस्त्यांचे जाळे असेल. दोन वाहने जाऊ शकतील, एवढी या रस्त्यांची रुंदी असेल. रस्त्यांच्या जवळपास पाण्याचे पाणवठे असतील, तेथे आलेले बिबटे पर्यटकांना बसमधून पाहता येतील. तर बिबट्यांसाठी नैसर्गिक अधिवासाची रचना असेल. त्यामध्ये झाडांना लटकवलेल्या ओंडक्यांवर किंवा तशाच स्वरूपाच्या निसर्गत वावरण्याच्या सुविधा असतील. बिबटे झाडाझुडपांच्या परिसरात वास्तव्यात असलेले पर्यटकांना पाहता येईल, अशी बिबट्या सफारीची साधारण रचना असणार असल्याचे जुन्नरचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

मी काय म्हातारा झालो काय…? तुम्हाला काय ठावं अजून… निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवारांचा व्हिडीओ ट्विट
जुन्नरच्या बिबट्या सफारीची उभारणी पहिल्यांदाच वन विभागाकडून केली जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प निसर्गाच्या जवळ जाणारा असेल. बिबट्याच्या वर्तनशैलीचा अभ्यास करून, आवश्यक अशा बाबींचा अंतर्भाव सफारी उभारताना केला जाणार आहे.

अमोल सातपुते, उपवनसंरक्षक, जुन्नर वन विभाग

सफारीच्या मागणीचा प्रवास

– भाजप-शिवसेनेचे सरकार असताना तत्कालीन आमदार शरद सोनवणे यांच्या कारकीर्दीत बिबट्या सफारीची घोषणा
– बरेच दिवस जागेच्या निश्चितीबाबत निर्णय अधांतरी राहिला.
– प्रथम आंबेगव्हाण, आळंदी आणि त्यानंतर पुन्हा जुन्नर तालुक्यातले कुरण भागात प्रकल्पासाठी चाचपणी.
– जुन्नरचा बिबट्या सफारी प्रकल्प बारामतीला गेल्याच्या बातमीने खळबळ झाली.
– माजी आमदार शरद सोनवणे यांचे उपोषण
– जुन्नर तालुक्यात उभ्या राहिलेल्या जनआंदोलनाची सरकारकडून दखल
– शरद सोनवणे यांच्यासह माजी वनमंत्री सुधीर मुंगंटीवार यांनी हा प्रकल्प आंबेगव्हाण येथेच करण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याचे फलित
– आमदार अतुल बेनके यांनी जनमताचा आदर करत प्रकल्पासाठी अजित पवार यांना केलेल्या आग्रहाची पूर्ती

असा असेल प्रकल्प

– जुन्नरची बिबट्या सफारी ठरणार राज्याच्या पर्यटनाचा मानबिंदू
– अनेक वर्षांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याने जुन्नरवासियांमध्ये चैतन्य
– १६ बिबट्यांसाठी १३५ एकरांमध्ये साकारणार प्रकल्प
– सफारी उभारणीसाठी ८० कोटी ४० लाख रुपये होणार खर्च
– बिबटे पाहण्यासाठी २५ आसनक्षमतेच्या ८ इलेक्ट्रीक बसची सुविधा
– अडीच किलोमीटर अंतर्गत रस्त्यांचे जाळे
– प्रकल्पाची उभारणी वन विभाग करणार असल्याने निसर्गाच्या जवळ जाणारा प्रकल्प ठरेल

लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार मोठी लढाई हरले; आयोगाच्या निकालाने किती मोठा धक्का बसला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed