• Mon. Nov 25th, 2024
    मागण्यांची पूर्तता होत नसल्याने निवासी डॉक्टरांचा संप; ४५० डॉक्टर संपामध्ये होणार सहभागी

    पुणे: निवासी डॉक्टरांच्या मागण्यांची पूर्तता होत नसल्याने महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटना (मार्ड) आज, बुधवारपासून (सात फेब्रुवारी) बेमुदत संप पुकारणार आहे. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ४५० निवासी डॉक्टर या संपामध्ये सहभागी होणार असल्याने ससून रुग्णालयातील रुग्णसेवा विस्कळित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

    या संपामुळे सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णसेवा विस्कळित होणार असून, बाह्यरुग्ण विभागातील रुग्णसेवेला सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. राज्यातील सर्व सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपामध्ये सहभागी होणार असून, आज सायंकाळी पाचपासून संपाला सुरुवात होणार आहे. निवासी डॉक्टरांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये संप करण्यात आला होता. त्या वेळी राज्य सरकारने सर्व मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिल्याने संप मागे घेण्यात आला होता. मात्र, आश्वासन देऊन एक वर्ष झाले, तरी सरकारकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने पुन्हा संप पुकारण्यात आल्याचे निवासी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
    फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स उद्योगाची ६.४ टक्के वाढ; नीलसन आयक्यू अहवालातून माहिती समोर
    विद्यार्थ्यांच्या वाढत्या संख्येमुळे प्रत्येक वैद्यकीय महाविद्यालयामधील वसतिगृहांमधील जागा अपुरी पडत आहे. विद्यार्थ्यांची संख्या वाढली; पण निवासाच्या सुविधेत वाढ झालेली नाही. त्यामुळे वसतिगृहांची संख्या वाढवण्याची मागणी निवासी डॉक्टरांकडून करण्यात येत आहे. अनेकदा काही महिने विद्यावेतन प्रलंबित राहते; तसेच अनेकदा वेळेवर वेतन मिळत नसल्याची तक्रार निवासी डॉक्टरांनी केली आहे. या कालावधीत रुग्णालयातील सर्व आपत्कालीन सेवा सुरू राहणार असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. निखिल गट्टाणी यांनी सांगितले.

    पुढील मागण्यांसाठी संप

    -‘एनएमसी’च्या नियमाप्रमाणेच वसतिगृहाची सुविधा मिळावी.
    – विद्यावेतनाची रक्कम नियमित करणे.
    – प्रलंबित रक्कम मिळावी.
    – विद्यावेतनामध्ये वाढ करणे.
    – महिन्याच्या १० तारखेला विद्यावेतन मिळावे.
    – केंद्रीय संस्थांप्रमाणे विद्यावेतन मिळावे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *