• Mon. Nov 25th, 2024

    Maratha Survey: मुंबईतील मराठा सर्वेक्षण पूर्ण, साडेतीन लाख घरांचा सर्वेक्षणास नकार

    Maratha Survey: मुंबईतील मराठा सर्वेक्षण पूर्ण, साडेतीन लाख घरांचा सर्वेक्षणास नकार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाचे मुंबईतील काम पूर्ण झाले आहे. २३ जानेवारीपासून सर्वेक्षणाला सुरूवात झाल्यानंतर २ फेब्रुवारीपर्यंत ३८ लाख ८४ हजार ८०७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले असून, १०० टक्के सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली.

    मुंबईत २३ जानेवारीपासून मराठा सर्वेक्षणास सुरूवात करण्यात आली होती. पालिका क्षेत्रातील ३८ लाख ७९ हजार ४६ इतक्या घरांचे सर्वेक्षण करण्यासाठी सुमारे ३० हजार कर्मचारी कार्यरत होते. सर्वेक्षणासाठी ३१ जानेवारीपर्यंत अंतिम मुदत होती. ही मुदत २ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली. घरांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट गाठत १ फेब्रुवारीलाच सर्वेक्षणाचे काम पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे)डॉ.सुधाकर शिंदे यांनी दिली.

    पाच लाखांहून अधिक घरे बंद

    २३ जानेवारी ते १ फेब्रुवारीपर्यंत ३८ लाख ८४ हजार ८०७ घरांचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यापैकी २९ लाख ४३ हजार २७९ घरांनी सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला. ५ लाख ८२ हजार ५१५ घरे बंद असल्याचे सर्वेक्षण अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या निर्दशनास आले. ३ लाख ५८ हजार ६२४ घरांनी सर्वेक्षणाला नकार दिला. सर्वेक्षण ऐच्छिक स्वरुपाचे असल्याने प्रत्यक्ष सर्वेक्षण सुरू करण्यापूर्वी प्रतिसादकर्त्याकडून संमती मिळविणे गरजेचे होते. सर्वेक्षणात भाग घेण्यास नकार दिल्यास, घराचा तपशील नोंद करुन तातडीने पुढील घरी जाऊन सर्वेक्षण करण्याच्या सूचना असल्याचे पालिकेने स्पष्ट केले होते. नकार देणाऱ्या कुटुंबाचे समुपदेशन करुन घरांचे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा पर्याय निवडला होता.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed