मॅट्रिमोनियल साइटवरून क्रमांक घेऊन वधूंच्या पालकांचे माहिती घेण्यासाठी फोन येत आहेत. या फोनवर ‘अपेक्षा काय आहे,’ पासून वैयक्तिक माहिती विचारण्यात येत असल्याने संबंधित आमदारांनी डोक्याला हात लावला. या पार्श्वभूमीवर हा खोडसाळपणा कुणी केला, याचा शोध घेण्यात येत आहे. विवाहित आमदाराला सातत्याने विवाहासाठी फोन येऊ लागल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, या प्रकाराची मतदारसंघात जोरदार चर्चा रंगली आहे.
संबंधित आमदारांचा मोबाइल क्रमांक गेल्या आठवड्यात एका मॅट्रिमोनियल वेबसाइटवर टाकण्यात आला. या प्रकाराची आमदारांना कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, दोन दिवसांनंतर संबंधित मॅट्रिमोनियल वेबसाइटच्या कॉल सेंटरमधील प्रतिनिधींनी संबंधित आमदारांना फोन करून संभाव्य वधूंचे नातेवाइक आणि पालक माहितीची विचारणा करीत असल्याचे कळवले. या वयात मॅट्रिमोनियल साइटवरून विवाहासाठी फोन आल्याने आमदार पुरते हैराण झाले आणि त्यांनी कॉल कट केला.
सातत्याने माहितीची विचारणा
आमदारांनी कॉल कट केल्यानंतर हा प्रकार थांबला तर, नाहीच; त्यानंतर सातत्याने फोनचा भडिमार सुरू झाला. महत्त्वाच्या बैठका सुरू असताना विविध क्रमांकावरून फोन येऊ लागल्याने आमदारांची पाचावर धारण बसली. ही कटकट कायमची थांबविण्यासाठी त्यांनी कॉल सेंटरशी संपर्क साधून ‘मी विवाहित आहे, मला कॉल करू नका,’ असे बजावले. तरीही त्यानंतर तीन ते चार दिवस हा त्रास सुरूच राहिला. ‘माझ्या वैयक्तिक अडचणी असून, मी आता लग्न करू शकत नाही,’ असेही कॉल सेंटरला कळविण्यात आले. तरीही संबंधित प्रतिनिधीने आपल्या परीने संपर्क साधून ‘तुम्ही लग्नासाठी होकार द्या, तुमच्यासाठी देखण्या आणि सुंदर मुलीचे स्थळ आले आहे,’ असे सांगून आमदारांचा पिच्छा काही सोडला नाही.
अन् सुटला संयम…
अनेकदा सांगूनही मॅट्रिमोनियल वेबसाइटचे प्रतिनिधी माघार घेण्यासाठी तयार नसल्याची पुरती खात्री पटल्यावर संबंधित आमदारांनी चिडून अर्वाच्च शब्दात कॉल सेंटरच्या प्रतिनिधीला झापले. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून फोन येणे बंद झाले. एकंदरीतच कुणाच्या तरी खोडसाळपणामुळे संबंधित आमदारांना चांगलाच मनस्ताप झाला, हे नक्की.
पोलिसांत तक्रार नाही
मॅट्रिमोनियल वेबसाइटवर आमदारांचा मोबाइल क्रमांक कुणी नोंदविला, हे अद्याप गुलदस्तातच आहे. या प्रकरणी संबंधित आमदारांनी पोलिसांत तक्रार दाखल केली नाही.