मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी अंबरनाथ तालुक्यातील द्वारली गावात आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यात जमिनीवरून वाद सुरू होता. हा वाद शुक्रवारी संध्याकाळी उल्हासनगर हिललाईन पोलीस स्टेशनमध्ये पोहचला. मात्र काही वेळातच हिललाईन पोलीस स्टेशनच्या आतच या वादात शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाला. त्यामुळे जखमी महेश गायकवाड यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र गायकवाड यांच्यावर नेमका गोळीबार कोणी केला, याबाबत माहिती मिळू शकली नाही.
स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासमक्ष हा प्रकार पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या दालनात घडला. यामध्ये महेश गायकवाड गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाठीत दोन आणि पायात एक गोळी लागली आहे. त्यांच्यावर सध्या उल्हासनगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले आहे.
कल्याण पूर्व शहर प्रमुख महेश गायकवाड आणि भाजप आमदार गणपत गायकवाड हे दोघे हिललाईन पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी राजकीय वादातून महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. जखमी अवस्थेत महेश गायकवाड यांना तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असून पुढील उपचारासाठी त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
दरम्यान या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनातच हा प्रकार घडल्यानं चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्यासमक्ष हा प्रकार घडला आहे. यानंतर कल्याण पूर्वेत पोलिसांचा कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच कल्याण शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या ऑफिसच्या बाहेर नागरिकांनी गर्दी केली आहे.