• Mon. Nov 25th, 2024
    हिंदुस्तानातला सगळ्यात हुशार माणूस, इशारा दिला की गाड्या तयार-मंत्री हजर, भुजबळांचे चिमटे

    मुंबई : मराठा समाजाला कुणबी दाखले देऊन मागच्या दाराने ओबीसी आरक्षणात घुसविण्यात आलंय, त्यामुळे आमचं आरक्षण हळूहळू संपुष्टात येईल. आमचं म्हणणं होतं की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ते वेगळं द्या. परंतु झुंडशाहीच्या पुढे नमतं घेऊन मागच्या दाराने लाखो दाखले देण्याचं काम सुरू आहे, असा आरोप करून आता न्यायालयीन लढा लढण्याचा इरादा मंत्री, ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी बोलून दाखवला. सगेसोयरे वगैरे प्रकरणामुळे ओबीसी-भटके विमुक्त मंडळींचं आरक्षण संपुष्टात येतंय. आमच्यापुढे पर्याय काय- आमच्या आमदार-खासदारांनी कैफियत मांडणं, कोर्टापुढे जाऊन आम्ही आमची कैफियत मांडणं. रॅली मोर्चे काढून लोकांची जागृती करणं आणि त्याद्वारे आम्ही आमचं म्हणणं मांडणं. संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी आम्ही विविध आयुधे वापरतो आहोत, असं भुजबळ म्हणाले. ते मुंबईत बोलत होते.

    आमच्या आरक्षणात जर आडकाठी करत असाल तर मंडल आयोगाला आम्ही न्यायालयात आव्हान देऊ, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. त्यावर छगन भुजबळ यांनी होत हिम्मत असेल तर मंडल कमिशनला आव्हान द्यावं, असं म्हणून जरांगेंचं चॅलेंज स्वीकारलं आहे. जरांगेंएवढा ज्ञानी हिंदुस्तानात कुणी नाही. ३ कोटी मराठा मुंबईत आणणार होते, वाशीत आलेले ३ कोटी मराठा सगळ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांना कोटी आणि लाखातला फरक कळतो का? ज्यांना लाख कोटीतला फरक कळत नाही, असा माणूस मंडल कमिशन आव्हान देण्याची भाषा करतो. हिम्मत असेल तर त्यांनी सुप्रीम कोर्टात जरूर मंडल कमिशनला चॅलेंज करावं, असं भुजबळ म्हणाले.

    जोपर्यंत शेवटच्या घटकाला मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरूच राहणार आहे असं सांगून मसुद्याचं कायद्यात रुपांतर झालं नाही तर पुन्हा आंदोलन करू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. त्यावर बोलताना भुजबळ यांनी सरकार आणि मनोज जरांगे यांच्यावर मार्मिक फटकेबाजी केली. “आमचे सचिव, मंत्री ताबडतोब जातील, गाड्या वगैरे तयार होत असतील, काही जीआर काढायचे असतील तर ते पण ताबडतोब निघतील…” अशी टोलेबाजी त्यांनी केली.

    ओबीसींच्या प्रश्नावर लढत असताना आपण एकटे पडले आहात का? भाजप आणि तुमचे पक्षाचे अध्यक्ष अजित पवार देखील सावध भूमिका घेत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर छगन भुजबळ यांनी सफाईदारपणे त्यावर बोलणं टाळलं. ज्यांचे प्रश्न त्यांनाच विचारा, असं म्हणून अधिकचं बोलण्यास त्यांनी नकार दिला. त्याचवेळी नोव्हेंबर महिन्यात आपण राजीनामा दिला होता का, या प्रश्नावरही बोलण्यास त्यांनी नकार दिला.

    वडेट्टीवारांच्या रॅलीला जाणार आहे का, या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, अनेक निमंत्रणे येतायत… चर्चा वगैरे करून ठरवत असतो. ओबीसी आरक्षण एल्गार यात्रा काढण्याचं आमचं ठरलेलं आहे. जिथे जिथे आवश्यक असेल तिथे जाऊ..

    तुम्ही ज्या सरकारमध्ये मंत्री आहात, तेच सरकार कॅबिनेटमध्ये असे निर्णय घेत आहे, त्या मंत्रिमंडळात आपल्याशी काही चर्चा होत नाही का या प्रश्नावर भुजबळ म्हणाले, बॅकडोअर एन्ट्री होत असेल तर त्याची चर्चा थोडीच होते? माझ्याकडे पुरावे आहेत, मी ते दाखवू शकतो.

    पुढे बोलताना भुजबळ म्हणाले, गावागावात गेले तीन दिवस उन्माद उत्सव सुरू झाला आहे. ओबीसींच्या घरासमोर फटाके लावायचे नाचायचे. लोकांना गावे सोडून जावे लागत आहे. जो उन्मादी उत्सव तो ओबीसीच्या विरूद्ध ते आम्ही पाहत आहोत. ही भयंकर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *