• Mon. Nov 25th, 2024
    अखेर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा; संजय राऊत म्हणाले…

    मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संजय राऊत यांच्या सह्याचे पत्रक आघाडीने जाहीर केले असून त्यानुसार ही घोषणा करण्यात आली आहे.

    गेल्या काही दिवसांपासून वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडी सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू होती. लोकसभा निवडणुकीत वंचित कोणासोबत असेल या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सोशल मीडियावरून वंचितचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा केली. महाविकास आघाडीची २ फेब्रुवारी रोजी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत.

    संजय राऊत यांचे ट्विट- वंचीत मुळे देशातील हुकूशाही विरोधी लढ्याला नक्कीच बळ मिळेल.भारताचे संविधान धोक्यात आहे. एकत्र येऊन संविधान वाचवावे लागेल.

    महाविकास आघाडीकडून जाहीर करण्यात आलेले पत्र…

    देश अत्यंत गंभीर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत आहे. महान लोकशाही परंपरा असलेला देश हुकूमशाहीकडे जातो आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताला महान संविधान दिले. व्यक्ती स्वातंत्र्य व लोकशाहीचा पुरस्कार केला. आज हे सर्व पायदळी तुडवले जाते आहे. २०२४ साली देशात झुंडशाहीने वेगळा निकाल लावला तर बहुदा ही शेवटचीच निवडणूक ठरेल, अशी शंका लोकांना वाटते. ही परिस्थिती बदलून राज्यात व देशात परिवर्तन घडवावे, यासाठी महाविकास आघाडी ची स्थापना झाली, हे आपण जाणताच. आपण स्वतः देशातील हुकूमशाही विरुद्ध लढत आहात. आम्ही त्याबद्दल आपले आभारी आहोत. वंचित बहुजन आघाडीने यापुढे अधिकृतपणे महाविकास आघाडीत सामिल व्हावे, अशी आमची भूमिका आहे.

    दि. ३० जानेवारी रोजी मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत आपल्या सुचनेनुसार, वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी सहभागी झाले. वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीत सामिल व्हावे, यावर शिवसेना, काँग्रेस तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमत झाले असून, त्यानुसार वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश केला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed