बनावट जिऱ्यांची विक्री करण्यासाठी दोघेजण येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शांतीनगर पोलिसांच्या पथकाने भिवंडीतील फातमानगर येथील ९० फुटी रस्त्यावर सापळा लावून एक टेम्पो पकडला. चालक शादाब आणि चेतन यांना ताब्यात घेत टेम्पोमधून सात लाख १९ हजार ७०० रुपये किमतीचा दोन हजार ३९९ किलो बनावट जिऱ्याचा साठा जप्त केला. त्यावेळी एकूण ८० गोण्या आढळल्या. प्रत्येक गोणीमध्ये एक किलो वजनाची ३० पाकिटे होती. एका किलोची किंमत ३०० रुपये आहे. बनावट जिऱ्यासह पोलिसांनी टेम्पो ताब्यात घेऊन शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि चेतन व शादाब यांना अटक केली. नंतरच्या चौकशीमध्ये बनावट जिरे पालघरमधील कारखान्यात तयार करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
आरोपी चेतन याने पालघर जिल्ह्यातील नंडोरे येथे बनावट जिरे बनावण्याचा कारखाना सुरू केला होता. या कारखान्यातून पोलिसांनी ९०० किलो बनावट जिरे, ते बनवण्यासाठी लागणारी वेगवेगळ्या रंगांच्या रसायनांची पावडर असे एकूण ३० लाखांचे साहित्य जप्त केले आहे. शादाब पालघरमध्ये राहात असून चेतन मुंबईतील कांदिवलीमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपी बनावट जिऱ्यांची विक्री हॉटेल, कॅटरर्स यांना करत असल्याची बाब पोलिसांच्या चौकशीमध्ये स्पष्ट झाली. गेल्या वर्षभरापासून हा गैरप्रकार चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जिरे बनवण्यासाठी बडिशेपच्या कांड्या, लाकडाचा भुसा
आरोपी बडिशेपच्या कांड्या, लाकडाचा भुसा तसेच रसायनांचा वापर करून बनावट जिरे बनवत असल्याची माहिती भिवंडीचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दिली. बनावट जिरे खऱ्या जिऱ्यामध्ये मिसळले जात होते. आरोपी बनावट जिरे प्रति किलो २०० ते २२० रुपये विक्री करत असल्याचे त्यांनी सांगितले. बनावट जिऱ्यांची विक्री मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी येथील मसाला मार्केटमध्ये करण्यात येत असल्याची बाब पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आली आहे.
असा उघड झाला बनाव
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी जिरे पाहिल्यानंतर लाकडाच्या भुशाला वेगवेगळ्या रासायनिक पावडरचा थर देऊन जिरे बनवल्याचे आढळले. तसेच, हे जिरे पाण्यात टाकल्यानंतर ते पूर्णपणे विरघळून काळ्या रंगाचे पाणी तय़ार झाले. तेव्हा जप्त केलेले जिरे बनावट असल्याचे आढळले.