• Wed. Nov 27th, 2024

    कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते प्रारंभ

    ByMH LIVE NEWS

    Jan 26, 2024
    कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्याहस्ते प्रारंभ

    सांगली, दि. 26, (जि. मा. का.) : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कामगार केसरी आणि कुमार केसरी कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत जिल्हा क्रीडा संकुल येथे झाले.

    उद्‌घाटनप्रसंगी आमदार सुधीर गाडगीळ, महापालिका आयुक्त सुनील पवार, महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे कल्याण आयुक्त रविराज इळवे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरावडेकर, सहाय्यक कामगार आयुक्त मुजम्मिल मुजावर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नसीरुद्दीन नायकवडी, नामदेव बंडरे, पृथ्वीराज पवार, कुस्ती प्रशिक्षक काकासाहेब पवार, अमोल बुचडे, कामगार कल्याण अधिकारी संभाजी पवार आदि उपस्थित होते.

    महाराष्ट्र कामगार कल्याण निधी अधिनियम १९५३ अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या नोंदित कंपन्या, कारखाने इत्यादी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या २३७ कामगार व त्यांच्या पाल्यांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. राज्य / राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेच्या नियमांप्रमाणे स्पर्धा होत असून कुस्ती सामने मॅटवर खेळवले जात आहेत.

    कल्याण आयुक्त रविराज इळवे यांनी निमंत्रित मान्यवर व उपस्थिताचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मान्यवरांच्या हस्ते ‍दिपप्रज्वलन करण्यात आले व रंगीत फुगे आकाशामध्ये सोडून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

    कामगार केसरी आणि कुमार केसरी किताब पटकवणाऱ्या कुस्तीगिरांना पारितोषिक रक्कमेसह चांदीची गदा, मानाचा पट्टा व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात येणार आहे. कामगार केसरी कुस्ती स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 75 हजार रूपये, व्दितीय पारितोषिक 50 हजार रूपये, तृतीय पारितोषिक 35 हजार रूपये व उत्तेजनार्थ पारितोषिक 20 हजार रूपये आहे. कामगार पाल्यांसाठी आयोजित कुमार केसरी स्पर्धेचे प्रथम पारितोषिक 51 हजार रूपये, व्दितीय पारितोषिक 35 हजार रूपये, तृतीय पारितोषिक 20 हजार रूपये व उत्तेजनार्थ पारितोषिक 10 हजार रूपये आहे. तसेच विविध 5 वजनी गटात सामने होणार असून विजेत्यांना 25 हजार ते 10 हजार रूपयांची पारितोषिके दिली जाणार आहेत.

    पारितोषिक वितरण समारंभ उद्या दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed