• Sat. Sep 21st, 2024
वडिलांच्या जवळच्या मित्राकडूनच प्रणिती शिंदे यांना आव्हान, लोकसभेच्या तयारीला सुरूवात

सोलापूर : आगामी लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सोलापुरातील नेत्यांनी कंबर कसली आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्या मुलीच्या खासदारकीसाठी मतदारसंघात सक्रिय झाले आहेत. काँग्रेस पक्षाकडूनही आमदार प्रणिती शिंदे यांना सोलापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्यासंबंधीचे संकेत दिले जातायेत. याच पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे देखील चांगल्याच अॅक्टिव्ह झाल्या आहेत. त्या देखील सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदारांशी संवाद साधत आहे. मात्र सुशीलकुमार शिंदे याचे जवळचे मित्र सुधीर खरटमल यांना खासदारकीची स्वप्नं पडू लागली आहेत. सुधीर खरटमल यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या केकवर ‘भावी खासदार’ असे लिहून थेट सुशीलकुमार शिंदे यांना आवाहन दिले आहे. सुशीलकुमार शिंदे आणि सुधीर खरटमल यांच्यात घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध होते. आगामी लोकसभा निवडणुकीत सुधीर खरटमल यांची भूमिका काय असेल याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे.

जाहीरपणे सांगत नसले तरी खरटमल कार्यकर्त्यांमार्फत संदेश देतात

सुधीर खरटमल हे काही काळ काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहर अध्यक्ष देखील होते. वेगवेगळ्या मतभेदांमुळे सुधीर खरटमल, माजी नगरसेवक यु. एन. बेरिया आदी जुन्या काँग्रेस नेत्यांनी काँग्रेसपासून दूर जाणे पसंद केले. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना सुधीर खरटमल यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत घरोबा केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघ राखीव असल्याने २०२४ च्या निवडणुकीत आरक्षित उमेदवार नशीब आजमावणार आहेत. सुधीर खरटमल यांनी देखील दबक्या पावलांनी लोकसभेची तयारी सुरु केली आहे. सुधीर खरटमल हे जाहीरपणे सांगत नसले तरी कार्यकर्त्यांमार्फत सोलापूरच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मागू शकतात. तसा संदेश देण्याचा प्रयत्न सुधीर खरटमल हे करत असल्याची चर्चा आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघात संभ्रम कायम

देशात २०१४ साली मोदी लाटेत सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे नवखे उमेदवार शरद बनसोडे यांनी पराभव केला होता. २०१९ साली पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपच्या जय सिद्धेश्वर महाराज यांनी पराभव केला. काँग्रेसचा दोन वेळा पराभव झाल्याने ही जागा काँग्रेसकडून राष्ट्रवादी काँग्रेसला द्यावी अशी मागणी जोर धरू लागली. रोहित पवार यांनी देखील अनेकदा मुक संमती दिली. राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीची स्थापना झाल्याने सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी की काँग्रेसचा याचा तिढा अजून सुटलेला नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते व नेते आणि काँग्रेस पक्षाचे नेते व कार्यकर्ते संभ्रमात आहेत. राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी थेट भावी खासदार सुधीर खरटमल असा उल्लेख केकवर केल्याने अनेक जण बुचकळ्यात पडले आहेत.

भाजपचा उमेदवार अजूनही ठरला नाही

आघाडीप्रमाणेच भाजपचा उमेदवारही आणखी जाहीर झालेला नाहीये. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा केल्याने सोलापुरात भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भाजपचा उमेदवार कोण असणार याकडे मतदार लक्ष ठेवून आहेत.

दुसरीकडे काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदे हेच उमेदवार असणार, असं मानून काँग्रेस कार्यकर्त्यांनी तयारी सुरू केली आहे. परंतु सुशीलकुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले सुधीर खरटमल आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे परिवारा विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उभारणार की नाही हा देखील मोठा प्रश्न आहे. परंतु भाजप लाटेला रोखण्यासाठी इंडिया आघाडीला वज्रमूठ घट्ट करण्याची गरज आहे. अन्यथा २०१४ आणि २०१९ साली ज्याप्रकारे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता, तसाच पराभव २०२४ सार्वत्रिक निवडणुकीत देखील होऊ शकतो,अशी शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed