• Sat. Sep 21st, 2024

नाशिककरांनो सावधान! ४१ क्रेडिट कार्डधारकांची फसवणूक, तब्बल ३४ लाखांना ‘कॅशलेस’ गंडवलं

नाशिककरांनो सावधान! ४१ क्रेडिट कार्डधारकांची फसवणूक, तब्बल ३४ लाखांना ‘कॅशलेस’ गंडवलं

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : एका फायनान्स कंपनीत एजंट असणाऱ्याने क्रेडिट कार्ड धारकांच्या माहितीचा गैरवापर करून त्यांच्या कार्डमार्फत विविध ठिकाणी ‘कॅशलेस’ आर्थिक व्यवहार केल्याची धक्कादायक बाब उघड झाली. याप्रकरणी ४१ क्रेडिट कार्ड धारकांची ३४ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांना प्राप्त झाली. त्यानुसार गंगापूर पोलिसांत संशयिताविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉलेजरोड परिसरातील एकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यान्वये, कमलेश मनसुख खटकाळे (रा. चुंचाळे शिवार) या संशयिताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा संशयित कॉलेजरोड परिसरात असलेल्या एका फायनान्स कंपनीत एजंट म्हणून कार्यरत आहे. संशयिताने २४ ऑक्टोबर ते ३० डिसेंबर २०२३ या कालावधीत फिर्यादी यांसह इतर ४१ जणांची ३३ लाख पस्तीस हजार रुपयांची फसवणूक केली. संशयिताने ‘मी फायनान्स कंपनीमध्ये कामाला आहे. क्रेडिट कार्ड सुरू किंवा बंद करणे, कर्जासंदर्भातील कामे करतो, काही असल्यास कळवा’, असे सांगून अनेकांना हेरले. त्यानंतर क्रेडिट कार्डचे चार्जेस, आर्थिक व्यवहारासंदर्भात तक्रारी घेऊन काही जण त्याच्याकडे गेले. त्यातील ४१ संशयितांच्या क्रेडिट कार्डची माहिती घेत त्याने तांत्रिक स्वरुपात विविध ठिकाणी ‘कॅशलेस’ व्यवहार केले. क्रेडिट कार्डच्या व्यवहारांच्या नोंदी वापरकर्त्यांनी बघितल्यावर हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
संवेदनाच सरणावर; चक्क मृतदेहावरील दागिन्यांची केली चोरी! नाशिक सिव्हिल रुग्णालयातील प्रकार
संशयिताची ‘स्मार्ट’गिरी

संशयिताने क्रेडिट कार्ड वापरकर्त्यांची गोपनीय माहिती घेतली. त्याद्वारे पेट्रोल पंप, मॉल व इतर ठिकाणी त्या क्रेडिट कार्डांच्या क्रमांकावरून व्यवहार करून ‘कॅशलेस’ खरेदी केली. त्यामुळे संशयिताकडून रोख स्वरुपात पैसे वसुल करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर आहे. काही वापरकर्त्यांनी कार्ड बंद करूनही दंड व रक्कम वाढत असल्याने फायनान्स कंपनीत चौकशी केल्यावर हा प्रकार उघड झाला.

संशयिताने क्रेडिट कार्डचा वापर कुठे केला, यासह रकमेतून कोणते व्यवहार केले, यासंदर्भात तांत्रिक तपास सुरू आहे. या संदर्भात इतर कोणाची फसवणूक झाली असल्यास अशा व्यक्तींनी पुढे येऊन पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवावी.- नरेंद्र बैसाणे, सहायक पोलिस निरीक्षक, गंगापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed