मराठी भाषा विभागातर्फे अर्थसंकल्पाच्या निमित्ताने एक जुलै २०२२ ते १३ डिसेंबर २०२३ पर्यंत राबविण्यात आलेल्या योजनांच्या माहितीचा अहवाल ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या हाती आला आहे. या अहवालात विविध योजनांसाठी करण्यात आलेली मूळ तरतूद आणि त्या काळात झालेला खर्च याची सविस्तर माहिती आहे. यात मराठी भाषा प्रसार आणि प्रचाराच्या दृष्टीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा, मराठी भाषा गौरव दिन, वाचन प्रेरणा दिन यासारख्या अनेक दिनांच्या आयोजनासाठी २०२३-२४ या वर्षासाठी एकूण २.५० कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ ०.०२ कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याची माहिती हाती आली आहे. तर, २०२२-२३ या वर्षासाठी तीन कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १.७६ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.
पुस्तकाचे गाव या योजनेचा विस्तार करण्यासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी शून्य रुपये खर्च झाला आहे. बहुचर्चित मराठी भाषा भवनासाठी आणि मराठी भाषा भवनाच्या उपकेंद्रासाठी २०२३-२४ या वर्षासाठी ३४.७२ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी शून्य रुपये खर्च झाला आहे. गेल्या वर्षी २९.८६ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ०.६१ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. उत्तम पुस्तकांना उत्तेजन देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या साहित्य मंडळाच्या विविध पुरस्कारांसाठी यंदा ०.५७ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ०.०३ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ०.५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी ०.४१ कोटींचा निधी खर्च करण्यात आला होता.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संमेलनाच्या आयोजनासाठी यंदा दोन कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी एकही रुपया खर्च करण्यात आलेला नाही. महाराष्ट्रातील मुख्य प्रवाहापेक्षा वेगळा प्रवाहातील जनसमूहांच्या आणि उपेक्षित वर्गाच्या अन्य मराठी साहित्य संमेलनांना दरवर्षी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे अनुदान देण्यात येते. यासाठी यंदा २.४५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यापैकी केवळ ०.४५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे. दरम्यान, निधीची तरतूद असतानाही कमी खर्च झाल्याबद्दल मराठी भाषामंत्री दीपक केसरकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकलेला नाही.
काय सांगते आकडेवारी?
योजना निधीची तरतूद (कोटी रु.) एकूण खर्च (कोटी रु.)
साहित्य संस्थांना अनुदान ०.७० ०.१४
नवलेखक योजनेअंतर्गत मानधन ०.०८ ०.०१
नवेदित लेखकांसाठी कार्यशाळा ०.०५ ०.०१
नियतकालिके प्रकाशन अनुदान ०.२२ ०.०४
ललितेतर वाङ्मय प्रकाशन ०.०५ ०.०१
अ. म. म. साहित्य संमेलन २.०० ०.००
अन्य साहित्य संमेलने २.४५ ०.४५
(एप्रिल २०२३ ते १३ डिसेंबर २०२३)