माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आणि त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपमध्ये बुधवारी प्रवेश करणार आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडणार आहे. याबाबत खुद्द डॉ. उल्हास पाटील यांनी जाहिररित्या दुजोरा दिल्याने त्यांचा भाजपामधील पक्ष प्रवेश निश्चित झाला आहे. डॉ. उल्हास पाटील गेल्या ३० वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील काँग्रेसचे एकनिष्ठ पदाधिकारी राहिले आहेत. जळगाव जिल्ह्यातील रावेर लोकसभा मतदारसंघातून त्यांनी काँग्रेसकडून निवडणुक लढविली आहे.
१९९८ मध्ये तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे सरकार कोसळल्यानंतर मध्यावधी निवडणुका झाल्यात. तेव्हा एकदा डॉ. उल्हास पाटील हे काँग्रेसचे खासदार झाले होते. मात्र, हे सरकार १३ महिन्यांत कोसळले. १९९९ मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. तेव्हा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने पुन्हा आपल्याकडे खेचून आणला. तेव्हापासून आत्तापर्यंत या मतदारसंघात भाजपाचा खासदार आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत ही जागा काँग्रेसकडे असल्याने डॉ. पाटील येथूनच निवडणुकीची तयारी करीत होते.
रावेर लोकसभा मतदारसंघात जळगाव जिल्ह्यामधील ५ आणि बुलढाणा जिल्ह्यामधील १ (मलकापूर) असे एकूण ६ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट केले गेले आहेत. या मतदारसंघातून एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे खासदार आहेत. तर एकनाथ खडसेंनी भाजप सोडत राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने रक्षा खडसेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे केतकी पाटील आणि उल्हास पाटील यांना भाजप पक्षात प्रवेश देऊन त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रावेर लोकसभा निवडणकीच्या उमेदवारीबाबत कुठलीही चर्चा झाली नूसन भाजपात प्रवेश केल्यानंतर त्याबाबत भाजपातील वरिष्ठ नेते निर्णय घेतील अशी माहिती डॉ. उल्हास पाटील यांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात विकास व प्रगती सुरु आहे. त्यांच्या या नेतृत्वावर विश्वासन ठेवून भाजपामध्ये कन्या डॉ. केतकी पाटील यांच्यासह प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारी (दि.२४) रोजी मुंबईत हा प्रवेश सोहळा होणार आहे, असे उल्हास पाटील यांनी सांगितले आहे.