• Sat. Sep 21st, 2024
खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा संपन्न; यात्रेला सहा लाखांहून अधिक भाविक उपस्थित

सातारा: खंडोबाच्या नावानं चांगभलं… यळकोट यळकोट जय मल्हारच्या जयघोषात पाल (ता. कराड) येथील मल्हारी- म्हाळसा यांचा राजेशाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर संपन्न झाला. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे सहा लाखांवर भाविकांनी यात्रेला उपस्थिती लावली. खोबरे आणि भंडाऱ्यात पाल नगरी न्हाऊन निघाली. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखों भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या पाल (ता. कराड) येथील श्री खंडोबा देवाच्या यात्रेचा सोमवारी मुख्य दिवस होता.

पाल यात्रेसाठी उंब्रज पोलीस आणि प्रशासनाने यात्रेत केलेल्या बदलांमुळे यात्रा सुखकर पार पडली. वाळवंटात बांधलेल्या पुलामुळे मिरवणूक मार्गावरील ताण कमी झाला. तारळी नदीपात्रातील दक्षिणोत्तर बाजू भंडारा उधळणाऱ्या भाविकांच्या गर्दीने खचाखच भरली होती. पाल नगरीत खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा पाहण्यासाठी जमलेला अथांग जनसागर भंडारा खोबऱ्याच्या उधळणीने पिवळा धमक होऊन गेला. खंडोबा आणि म्हाळसा यांच्या शाही विवाह सोहळ्यासाठी विविध गावातील खंडोबाचे मानकरी, मानाचे गाडे, सासन काट्या, पालखीसह देवस्थानच्या आकर्षक रथातून प्रमुख मानकरी देवराज पाटील यांना घेऊन निघालेल्या शाही मिरवणूकीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले.
भगवी वस्त्रे आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ…; काळाराम मंदिरात उद्धव ठाकरेंच्या हस्ते महाआरती
दुपारी तीनच्या सुमारास खंडोबा देवस्थानचे प्रमुख मानकरी देवराज पाटील यांचे रथातून मंदिरात आगमन झाले. मंदिरातील सर्व विधी आटोपून दुपारी ४.१५ च्या सुमारास मानकरी देवराज पाटील देवाचे मुखवटे पोटावर बांधून अंधार दरवाजाजवळ आले. याठिकाणी ते रथात विराजमान झाले. तेथून मुख्य मिरवणुकीस सुरुवात झाली. मानकऱ्याचे गाडे, फुलांनी सजवलेल्या अबदागीरी, चोपदाराचा घोडा, सासन काठ्या, पालखी, मानाचे गाडे या पाठोपाठ शाही थाटात खंडेराया आणि म्हाळसा यांना रथातून घेऊन निघालेले मानकरी अशी भव्य दिव्य मिरवणूक मुख्य चौकात येताच भाविकांनी भंडारा खोबऱ्याची उधळण करत सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट… जय मल्हार, असा जयघोष केला.

नेहमी मुख्य मिरवणूक सुरु होताच या मार्गावर भाविकांची गर्दी होते. मात्र यंदा देखील ही गर्दी तारळीच्या वाळवंटात दिसून आली. मागील पाच वर्षाषापासून देवस्थान ट्रस्ट, यात्रा कमिटी आणि प्रशासन यांनी यात्रेपूर्वी केलेल्या योग्य नियोजनामुळे तारळी नदीवरील मुख्य पुलावरील गर्दी नियंत्रित राहण्यासाठी मदत झाल्याचे दिसून आले. सायंकाळी वाळवंटातून देवाची शाही मिरवणूक मारुती मंदिरमार्गे बोहल्याजवळ आली. यावेळी खंडेरायाच्या जयजयकाराने परिसर दुमदुमून गेला.

अयोध्येनंतर नाशिकमध्ये महापूजा, उद्धव-रश्मी ठाकरे दोन्ही मुलांसह काळारामाच्या दर्शनाला

देव मंडपात आल्यानंतर देवाला स्नान घालण्यात आले. देवाचे मुख्य मानकरी देवराज पाटील यांनी देवास बोहल्यावर चढविले. पारंपारीक पद्धतीने लाखो भाविकांच्या साक्षीने श्री खंडोबा आणि म्हाळसा यांचा शाही विवाह सोहळा गोरज मुहूर्तावर मोठ्या थाटात पार पडला. मिरवणुकीच्या वेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण राहावे, म्हणून ठिकठिकाणी चोख बंदोबस्तासाठी बँरिगेटस् उभारले होते. पाल ग्रामपंचायत, यात्रा कमिटी, देवस्थान ट्रस्ट, पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत बदे तसेच विविध विभागांचे अधिकारी तळ यात्रास्थळी तळ ठोकून होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed