• Mon. Nov 25th, 2024

    रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी

    रामायणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे वाद; भालचंद्र नेमाडेंविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्ली विद्यापीठ आणि ऑक्सफर्ड प्रकाशनाने बंदी घातलेल्या ‘ ३०० रामायणे ‘ पुस्तकातील चुकीच्या माहितीच्या आधारे साहित्यिक भालचंद्र नेमाडे हे हिंदुंच्या भावनांशी खेळत आहे. त्यामुळे राज्य सरकारने तातडीने नेमाडे यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी ‘, अशी मागणी शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाने केली आहे. नेमाडे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याचा इशारा न्यासाच्या वतीने धनंजय कुलकर्णी यांनी दिला आहे. शिक्षा संस्कृती उत्थान न्यासाच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत न्यासाच्या प्रतिनिधी बोलत होते. यावेळी कुलकर्णी, न्यासाचे प्रांत संयोजक डॉ. चंद्रकांत गुळेद, प्रांत अध्यक्ष अनिल महाजन, डॉ. सुनील भंडगे, डॉ. डी. डी. कुंभार आदी उपस्थित होते.

    भालचंद्र नेमाडे यांनी ३०० रामायणे या रामानुजन यांच्या निबंध ग्रंथाचा उल्लेख करीत, रामायणातील रामाची विविध रूपे विकृतीपूर्ण, रामाच्या हिंदू श्रद्धेला छेद देणारी आणि बदनामीकारक मांडण्याचा प्रयत्न केला आहे . रामानुजन यांचे हे पुस्तक २००८ मध्ये दिल्ली विद्यापीठाच्या कला विद्या शाखेच्या पदवी अभ्यासक्रमासाठी क्रमिक पुस्तक म्हणून समाविष्ट केले होते. शिक्षा बचाव आंदोलनाचे तत्कालीन राष्ट्रीय सचिव दीनानाथ बत्रा आणि सध्याचे राष्ट्रीय सचिव डॉ. अतुल कोठारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आंदोलनानंतर; तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर दिल्ली विद्यापीठाच्या विद्या परिषदेने हे वादग्रस्त पुस्तक रद्द केले या निर्णयासाठी विद्यापीठाने ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञांची समिती नेमली होती. या अहवालाच्या आधारे विद्यापीठाने या क्रमिक पुस्तकाने हिंदूंच्या भावना दुखावतात; तसेच तांत्रिक कारण देत हे पुस्तक अभ्यासक्रमातून रद्द केले.

    वाल्मिकी श्रृंग घराण्याचा कवी, त्यांना जसं आवडलं तसं वाल्मिकींनी रामायण लिहिलं, वाल्मिकींचा राम कशामुळे खरा? : नेमाडे

    या पार्श्वभूमीवर ‘ ३०० रामायणे ‘ या पुस्तकाच्या माहितीच्या आधारे भालचंद्र नेमाडे यांनी मत व्यक्त करणे योग्य आहे ? नेमाडेंचा परिचय इतिहास संशोधक म्हणून अथवा रामायणाच्या अभ्यासक म्हणून नाही. ३०० रामायणे या पुस्तकाचे मूळ प्रकाशन ऑक्सफर्ड विद्यापीठ प्रेस विभागाने केले आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या गेल्याबद्दल ऑक्सफर्ड विद्यापीठाने खेद व्यक्त केला होता; त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड विद्यापीठाला जे कळतं ते भालचंद्र नेमाडे यांना कळत नाही का ? भालचंद्र नेमाडे जाणीवपूर्वक डाव्या विचारांवरील आपली निष्ठा आणि पुरोगामी तो सिद्ध करण्यासाठी ३०० रामायाने या ग्रंथाचा आधार घेत आहेत. हे पुस्तक दिल्ली विद्यापीठाने अभ्यासक्रमातून इतिहासतज्ञांच्या अहवालाच्या आधारे रद्द केला. त्याचप्रमाणे ऑक्सफर्ड विद्यापीठाने या ग्रंथाचे प्रकाशन वितरण आणि रद्द केली आहे असे असतानाही हिंदू धर्मियांच्या रामाबाबतच्या असलेल्या श्रद्धा दुखावल्याबद्दल भालचंद्र नेमाडे यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी कुलकर्णी आणि डॉ. गुळेद यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

    पोलिसात तक्रार करू

    भालचंद्र नेमाडे यांच्याबाबत आदर आहे. ते साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांनी इतिहासकारांच्या भूमिकेत जाऊ नये. नेमाडे यांनी अपुऱ्या माहितीच्या आधारे वादग्रस्त विधाने तातडीने थांबवावीत. नेमाडे यांच्या विरोधात पोलिसात तक्रार करण्यात येईल, असा इशारा कुलकर्णी यांनी दिला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed