• Sat. Sep 21st, 2024
अख्ख्या राज्यात २०१९ ला काँग्रेसची एकच जागा निवडून आली होती, त्या चंद्रपुरात यंदा काय होईल?

चंद्रपूर-आर्णी लोकसभा मतदारसंघ खूपच चर्चेत आहे, त्याला कारण ठरलंय भाजपचे अभियान. भाजपाने मिशन १४४ घर चलो अभियानाची सुरूवात चंद्रपूरातून केलीये. भाजपाने ही जागा जिंकायचं मनावर घेतलं असली तरी, ती जिंकणे भाजपाला वाटते तेवढे सोपे नाही. इंडिया आघाडीत सहभागी होण्याचे निमंत्रण पाठविल्यास भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होईल, असे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय. महाराष्ट्रातील राजकीय स्थिती आणि त्यावर प्रकाश आंबेडकर यांची भूमिका पाहता ते इंडिया आघाडीत सहभागी होतील असे चित्र आहे. असे झाल्यास चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला बळ मिळेल. मात्र वंचितने स्वतंत्र उमेदवार दिल्यास भाजपच्या विजयाला हातभार लागेल. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर चंद्रपुरात कमळ कोमेजणार की फुलणार? हे ठरणार आहे.

राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघातील चंद्रपूर-वणी आर्णी हा महत्वाचा मतदार संघ आहे. या मतदार संघावर काँग्रेसचा प्रभाव होता. काँग्रेसच्या हक्काच्या या जागेवर १९९६ च्या निवडणुकीत भाजपच्या हंसराज अहिर यांनी विजय मिळविला होता. १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे नरेश पुगालिया यांनी ही जागा जिंकत भाजपाकडे गेलेला गड परत मिळविला. मात्र २००४ च्या निवडणुकीत ही जागा पुन्हा भाजपाकडे गेली. हंसराज अहिर दुसऱ्यांदा विजयी झाले. सन २००४, २००९ आणि २०१४ असे सलग तीनदा हंसराज अहिर यांनी ही जागा जिंकली. मात्र मोदी लाट असतानाही २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या बाळू धानोरकर यांनी ही जागा काँग्रेसला मिळवून दिली. विशेष म्हणजे महाराष्ट्रात लोकसभेच्या केवळ याच एका जागेवर काँग्रेसला विजय मिळविता आला होता. त्यामुळेच भाजपाने आपलं संपूर्ण लक्ष या जागेवर केंद्रित केले आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा: रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पुन्हा राऊत की महायुती बाजी मारणार? वाचा संपूर्ण समीकरण

दोन मंत्री, पाच आमदार तरीही भाजपाचा पराभव

चंद्रपूर लोकसभा मतदार संघातील राजुरा, चंद्रपूर बल्हारपूर, वणी आणि आर्णी या विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने विजय मिळविला होता. केंद्रात हंसराज अहिर गृहराज्य मंत्री होते. तर राज्यात सुधीर मुनगंटीवार अर्थमंत्री…. मोदी लाटेचा प्रभावही होता. तरीही २०१९ ला अहिर यांचा पराभव झाला. हा पराभव अहिर यांना न पचणारा ठरला. पक्षातूनच हंसराज अहिर यांचा गेम केला गेला, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. एव्हाना शांत असणारे अहिर यांनी एका भाषणात “मी सोडणार नाही” असे जाहिररित्या सांगून आपल्या मनातील सल बोलून दाखवली. यंदा भाजपाकडून हंसराज अहिर, मुनगंटीवार, जीवतोडे यांच्या नावाची चर्चा आहे. अहिर आणि मुनगंटीवार यांच्यात फार सख्य नाहीये. अहिर किंवा मुनगंटीवार यांच्यापैकी एकाला भाजपाने उमेदवारी दिली तर दुसरा कार्यकर्त्यांना ‘आतून’ काय आदेश देतो, यावर बरंच काही अवलंबून आहे.

भाजप सक्रिय, काँग्रेस नेहमीप्रमाणे सुस्त

चंद्रपूर -आर्णी मतदारसंघातील २०१९ चा पराभव भाजपाच्या जिव्हारी लागला आहे. हा पराभवाचं उट्टं काढण्यासाठी भाजप झटकून कामाला लागली आहे. त्यामुळे भाजपाने आपले पूर्ण लक्ष या जागेवर केंद्रित केले आहे. भाजपाच्या मिशन १४४ ची सुरुवात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत चंद्रपुरातून झाली.

वेध लोकसभा निवडणुकीचा : खोतकरांची तलवार म्यान, विरोधकांकडे उमेदवारांची शोधाशोध, तोडीचा प्रतिस्पर्धी नाही, दानवे निवांत!
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपच्या ‘घर चलो अभियाना’ची सुरुवात सुद्धा चंद्रपूर येथून करण्यात आली. मंत्री सुधीर मुनगंटीवार हे विविध उपक्रमातून जिल्ह्याचे लक्ष वेधत आहेत. राम मंदिरासाठी पाठविण्यात आलेले काष्टपूजन सोहळा असो की क्रीडा स्पर्धा, कृषी महोत्सव असो की खिचडीचा विश्वविक्रम असो यातून मतदारांचे लक्ष भाजपकडे वेधण्यात मुनगंटीवार यांना बऱ्यापैकी यश आले आहे.

दुसरीकडे काँग्रेस मात्र नेहमीप्रमाणे सुस्त आहे. खासदार धानोरकर यांच्या निधनाने काँग्रेस कार्यकर्ते खचले आहेत. त्यांच्या निधनानंतर या जागेवर अनेकांनी दावा केला आहे. मोदी सरकारच्या विरोधात काँग्रेस अधूनमधून आंदोलन करीत असते. या आंदोलनांनी मतदारावर फारसा प्रभाव पडलेला दिसत नाही. है तयार हम, असा नारा काँग्रेसने चंद्रपूरताही दिला. मात्र हा नारा देतानाही नेत्यांच्या आवाजात ‘जान’ नव्हती.

वेध लोकसभा निवडणुकीचा : शिर्डीत महायुतीची ताकद पण पवार-ठाकरेंना मोठी सहानुभूती, लोकसभेला काय होऊ शकतं? वाचा…
वंचितचा जोर

सन २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष विजयी झाला. या विजयामागे अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे वंचितने घेतलेले मतदान. वंचितने ऍड. राजेंद्र महाडोले यांना उमेदवारी दिली. महाडोले यांना १ लाख १२ हजार ७९ मते मिळाली होती. तर धानोरकर यांना ५ लाख ५९ हजार ५०७ मते मिळाली होती. दुसरीकडे अहिर यांना ५ लाख १४ हजार ७४४ मते मिळाली होती. धानोरकर ४४ हजार ७६३ मतांनी विजयी झाले होते. वंचितची मते गेमचेंजर आहेत. भाजपने लावलेला जोर आणि त्यात सुस्त असलेली काँग्रेस त्यामुळे वंचितच्या मतांना मोठी किंमत प्राप्त झाली आहे. त्यात जर वंचित इंडिया आघाडीत असेल तर काँग्रेसला तुलनेत कमी मेहनत घ्यावी लागेल.

वेध लोकसभा निवडणुकीचा : कल्याण सर्वाधिक चर्चेत, २०२४ च्या निवडणुकीत काय होणार?
जातीय समीकरणे प्रभावी

चंद्रपूर-आर्णी मतदारसंघात जातीय समीकरणांचा प्रभाव आहे. कुणबी, दलीत, मुस्लिम समाजाची येथे संख्या मोठी आहे. दलित, मुस्लिम मते काँग्रेसच्या हक्काची होती. मात्र आता या दोन्ही समाजातील मतदार वंचितकडे वळली आहेत. भाजपाला या प्रवर्गातून फार कमी मतदान होते. धानोरकरांनी विखुरलेल्या कुणबी समाजाला एकत्रित आणलं होतं. त्याचा फायदा धानोरकरांना झाला होता.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा मतदारसंघांचा समावेश

या लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदार संघ आहेत. त्यात चंद्रपूर जिल्हातील राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे तर यवतमाळ जिल्हातील वणी आणि आर्णी असे दोन विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राजुरा, वरोरा येथे काँग्रेसचे आमदार आहेत. चंद्रपूरमध्ये अपक्ष तर बल्लारपूर येथे भाजपचे आमदार आहेत. वणी, आर्णी मतदारसंघ भाजपाचा ताब्यात आहे.

वेध लोकसभा निवडणुकीचा : शिर्डीत महायुतीची ताकद पण पवार-ठाकरेंना मोठी सहानुभूती, लोकसभेला काय होऊ शकतं? वाचा…

विधानसभानिहाय आमदार

बल्लारपूर- सुधीर मुनगंटीवार (भाजप)
राजुरा- सुभाष थोटे (काँग्रेस)
वरोरा- प्रतिभा धानोरकर (काँग्रेस)
चंद्रपूर- किशोर जोरगेवार (अपक्ष)
वणी – संजिवरेड्डी बोदकुरवार (भाजप)
आर्णी- संदिप प्रभाकर धुर्वे (भाजप)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed