• Sat. Sep 21st, 2024

मागून ठोकर दिल्याने ट्रॅक्टर उलटला, शेतकऱ्याचा मृत्यू, अपघातस्थळी कांद्याचा सडा, मन हेलावणारं दृश्य

मागून ठोकर दिल्याने ट्रॅक्टर उलटला, शेतकऱ्याचा मृत्यू, अपघातस्थळी कांद्याचा सडा, मन हेलावणारं दृश्य

म. टा. वृत्तसेवा, मनमाड : मनमाडहून नंदुरबारला जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या बसची ट्रॅक्टरला धडक बसल्याने ट्रॅक्टरचालक जागीच ठार झाला, तर बसमधील दहा ते बारा प्रवासी जखमी झाले. मनमाड-मालेगाव मार्गावरील चोंडी घाटात शुक्रवारी (दि. १९) सकाळी सव्वासहाच्या सुमारास हा अपघात झाला. बसचालक जखमी झाला असून, त्याच्यासह जखमींवर मालेगावमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मालेगाव तालुका पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत अधिक माहिती अशी की, मनमाड आगाराची मनमाड-नंदुरबार बस (क्र. एमएच १४, बीटी ०८४६) शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास मनमाडहून निघाली. चोंडी घाटाच्या पायथ्याजवळून बस जात असताना मालेगावकडे कांदा घेऊन जात असलेल्या ट्रॅक्टरला बसने जोरदार धडक दिली. यात ट्रॅक्टर ट्रॉलीसह रस्त्याच्या कडेला उलटला. यात ट्रॅक्टरचालक अजय कानडे (वय ४१, रा. कानडगाव) हा शेतकरी जागीच ठार झाला. बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते. त्यात बसचालक संजय कातकडे यांच्यासह दहा ते बारा प्रवासी जखमी झाले. स्थानिकांनी तातडीने त्यांना मालेगाव येथे खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी ट्रॅक्टरमधील कांद्याचा खच पडल्याचे दिसून आले. अपघात घडल्याचे समजताच मालेगावचे सहाय्यक वाहतूक अधीक्षक रामराजे तसेच वाहतूक निरीक्षक कल्पेश कानडे व मनमाड आगार व्यवस्थापक विक्रम नागरे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कांदाविक्री राहिली, जीवही गेला…

कानडगाव येथील तरुण शेतकरी अजय कानडे ट्रॅक्टरमध्ये कांदे घेऊन मालेगावकडे चालले होते. सकाळी लवकर बाजार समितीत नंबर लावण्यासाठी ते भल्या पहाटेच निघाले होते. कांदे विकून घराकडे परतावे, अशी त्यांची अपेक्षा होती. पण पाठीमागून आलेल्या बसने त्यांचा घात केला. कांद्याची विक्री व पैसे मिळणे बाजूलाच राहिले आणि हकनाक जीव गेला. रस्त्यावर अस्ताव्यस्त पडलेले कांदे पाहून परिसरातील शेतकरी बांधवांना गहिवरून आले.
भरधाव ट्रकने ७ दुचाकी ४ चारचाकी १ रिक्षाला उडवले; भीषण अपघात एकाचा मृत्यू
अपघातातील जखमी

संजय कातकडे (बसचालक), किसनराव शिंदे (७५, रा. नांदेड), बापू गायकवाड (५८, टेहरे, ता. मालेगाव), तुकाराम इटकर (४१, हिंगोली), अनिल मिश्रा (५१) व रिता मिश्रा (४६, अकोला), पुंडलिक बोडके (३५, हिंगोली), दीपाली जाट (३५), कविता जाट (३२, सोयगाव ता. मालेगाव), सुशीला चपेले (६५ रा. परभणी), सीमा बसमतकर (४०, रा. परभणी), सुधीर बोदडे (३८, मनमाड), नीलेश बारसे (३४, मनमाड), उत्तम इटकर (४५, हिंगोली)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed