• Mon. Nov 25th, 2024
    अंतिम मतदार यादी २३ जानेवारीला प्रसिद्ध होणार, केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय

    पुणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी आता २२ ऐवजी २३ जानेवारीला (मंगळवारी) प्रसिद्ध होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. २२ जानेवारीला देशभरात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा असल्याने केंद्र सरकारपाठोपाठ राज्य सरकारने सुट्टी जाहीर केल्याने दुसऱ्या दिवशी अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे दुसऱ्यांदा मुदत बदलण्यात आली.
    पाच दिवसांसाठी संपूर्ण गाव जातं सुट्टीवर; कोकणात शिराळे गावची प्रथा, वाचा ‘या’ प्रथेबद्दल अधिक
    या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाचे अवर सचिव राजेश कुमार सिंग यांनी काल उशिरा परिपत्रक जारी केले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार यापूर्वी २७ ऑक्टोबरला महाराष्ट्रात प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर नवमतदारांना नोंदणी तसेच मयत आणि दुबार नावे वगळणे, मतदान कार्ड, पत्त्यात दुरुस्ती अशा कामांसाठी नऊ डिसेंबरची मुदत देण्यात आली होती. मात्र, केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रासह, आंध्रप्रदेश, कर्नाटक, बिहार, हरियाणा, झारखंड, केरळ, पंजाब, तामिळनाडू, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि दिल्ली अशा १२ राज्यांमध्ये अंतिम मतदार यादी जाहीर करण्याची मुदत २२ जानेवारी दिली होती.

    राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे म्हणाले, ‘देशात रामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा येत्या २२ जानेवारीला देशभर साजरा केला जात आहे. त्यासाठी केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. तर राज्य सरकारने सर्व सरकारी कार्यालयांना २२ जानेवारीला सुट्टीच जाहीर केली आहे. त्यामुळे त्या दिवशी सरकारी कार्यालये बंद असणार आहे. परिणामी, २२ ऐवजी २३ जानेवारीला आता अंतिम मतदार यादी जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने त्याबाबत आम्हाला निर्देश दिले आहेत.’

    अजित पवार राजकारणात कुठून आले, त्यांना कुणी आणलं, पहिल्यांदा तिकीट कुणी दिलं : शरद पवार

    दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी मुंबईत नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत सर्व जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी, पोलिस आयुक्त, पोलिस अधीक्षकांनी शिष्टमंडळासमोर तयारीबाबत तपशीलवार सादरीकरण केले. ‘पोलीस आणि इतर अंमलबजावणी संस्थांना अनधिकृत रोकड, दारू, ड्रग्ज आणि इतर प्रलोभनांच्या हालचालींवर लक्ष ठेवून राज्य निवडणूक यंत्रणेने कडक दक्षता आणि देखरेखीसह प्रलोभनमुक्त निवडणुकांवर भर द्यावा, असे आदेश दिले आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने महिला, तरुण तसेच उपेक्षित गट, ज्यामध्ये अपंग व्यक्ती आणि ट्रान्सजेंडर मतदार आणि नवमतदारांवर विशेष लक्ष केंद्रित करण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *