अयोध्येतील श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेकडे अवघ्या देशभरातील रामभक्तांचे डोळे लागले आहेत. येत्या सोमवारी अर्थात २२ जानेवारी रोजी हा सोहळा पार पडणार आहे. हा क्षण याचि देही याचि डोळा अनुभवण्यासाठी काही जणांनी अयोध्येकडे कूचही केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील जनतेला दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
परंतु झेलम परांजपे अध्यक्षा असलेल्या शाळेतील विद्यार्थिनींनी ही सुट्टी नाकारली आहे. त्याबद्दल खुद्द झेलम परांजपेंनी फेसबुक पोस्ट लिहून त्यांचा संकल्प व्यक्त केला आहे. “आम्ही सावित्रीच्या लेकी आणि आमचे बांधव जोतिबांची लेकरं…..सरकारी GR शेवटच्या क्षणी येवो की खूप आधी येवो, आम्हाला राम प्राण प्रतिष्ठेची सुट्टी नको. राम लल्ला सुद्धा खुश नाही होणार आमचा अभ्यास बुडला तर…. आमच्या अध्यक्षा झेलम ताईंनी निर्णय घेतला आहे की शाळा चालू राहणार….” असं त्यांनी लिहिलं आहे. या पोस्टवर अनेकांनी लाईक आणि कमेंट करुन पाठिंबा दर्शवला आहे. ही पोस्ट अनेकांनी शेअर केली असून सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.
याआधीच केंद्र सरकारने देशभरात अर्धा दिवस सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारने याबद्दलचा आदेश जारी केला होता. केंद्र सरकारने जारी केलेल्या आदेशात अर्धा दिवस सुट्टीचा उल्लेख आहे. कर्मचाऱ्यांच्या भावना आणि त्यांचा आग्रह लक्षात घेता केंद्र सरकारने अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय घेतला.
राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा होत असताना, २२ जानेवारी रोजी देशभरातील सर्व केंद्रीय कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक संस्था, कार्यालयांमध्ये दुपारी अडीच वाजेपर्यंत अर्धा दिवस सुट्टी असेल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे थेट प्रक्षेपण अधिकाधिक लोकांना पाहता यावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लांची मूर्ती आसनावर स्थानापन्न करण्यात आली. आता या मूर्तीची पहिली झलक समोर आली आहे. शिल्पकार अरुण योगीराज यांनी ५१ इंच उंची असलेली प्रभू रामचंद्रांची मूर्ती साकारली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News