• Mon. Nov 25th, 2024
    Mumbai Sion Flyover: आजपासून शीव उड्डाणपूल ‘बंद’, तब्बल २०० बसमार्ग बदलणार

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : शीव उड्डाणपूल पुनर्बांधणीसाठी आज, शनिवारपासून (ता. २०) बंद ठेवण्यात येणार आहे. कामानिमित्त दोन वर्षे हा पूल बंद होणार असल्याने, मुंबई वाहतूक पोलिसांनी वाहतुकीत बदल केले आहेत. याचा परिणाम बेस्टच्या २४ मार्गांवरील वाहतुकीवरही होणार आहे. यामुळे तब्बल २०२ बसगाड्या अन्य मार्गाने वळवण्याशिवाय बेस्ट उपक्रमासमोर पर्याय राहिलेला नाही. यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

    पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा शीव उड्डाणपूल हा मध्य रेल्वेकडून तोडण्यात येणार आहे. या पुलाची ‘आयआयटी’ने संरचनात्मक तपासणी केली असता, तो धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे जुना पूल तोडून नवीन पूल उभारणीसाठी मध्य रेल्वेबरोबरच मुंबई महापालिकेकडूनही निधी उपलब्ध केला जाणार आहे. त्यामुळे कामानिमित्त आजपासून हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माटुंगा विभागात बी. ए. रोडवरून शीव उड्डाणपूल पश्चिम वाहिनीमार्गे एल. बी. एस रोड तसेच संत रोहिदास रोडकडे जाणारी वाहतूक, त्याचप्रमाणे कुर्ला वाहतूक विभागात एल. बी. एस रोड, तसेच संत रोहिदास रोडवरून शीव उड्डाणपूल पूर्व वाहिनीवरून बी. ए. रोडमार्गे जाणारी वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद केली जाणार आहे. या मार्गावरील वाहतूक वाहतूक पोलिसांनी अन्य मार्गाने वळवण्याचा निर्णय घेतला आहे.

    मनोज जरांगे यांनी मुंबईत मराठा मोर्चा टाळावा, मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहन, जरांगे म्हणाले….
    याचा मोठा परिणाम बेस्ट बस सेवांवर होणार आहे. शीव उड्डाणपूल बंद होत असल्याने बेस्टच्या २४ मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम होत असून, या मार्गावरील २०२ बसगाड्या धावू शकणार नाही. त्यासाठी बेस्ट उपक्रमाने अन्य मार्गाचा पर्याय निवडला आहे. नेव्हीनगर ते वांद्रे कॉलनी, अँटॉप हिल ते सिप्झ बस स्टेशन, चुनाभट्टी टर्मिनस ते मालाड आगार, प्रतीक्षानगर आगार ते जे.व्ही.पी.डी बस स्थानक, ट्रॉम्बे ते सांताक्रुझ आगार, बॅकबे आगार ते धारावी आगार, चेंबूर टाटा पॉवर सेंटर ते सांताक्रुझ आगार, शिवाजीनगर बस स्थानक, वांद्रे बस स्थानक पश्चिम, वांद्रे बस आगार ते सीबीडी बेलापूर बस स्थानक, विजय वल्लभ चौक ते विक्रोळी आगार, वडाळा आगार ते चांदिवली संघर्षनगर आदी बस फेऱ्या या अन्य मार्गाने वळवण्यात येणार असल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. त्यामुळे या मार्गावरील नियमित प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट उपक्रमाने बस वळण्यात येणाऱ्या मार्गांवर वाहतूक निरीक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये बस थांब्यावर आलेल्या प्रवाशांनाही पर्यायी बस मार्गांची माहिती दिली जाणार आहे.

    Mumbai Megablock: उद्या तिन्ही रेल्वेमार्गांवर खोळंबा, कोणत्या लोकल रद्द? वाचा टाइमटेबल

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed