महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) पिंपरी-चिंचवड ते निगडी दरम्यानच्या विस्तारित मेट्रो मार्गिकेला नुकतीच मंजुरी मिळाली होती. निगडीपर्यंतच्या संपूर्ण उन्नत मार्गाच्या तुलनेत स्वारगेट-कात्रज ही मार्गिका भूमिगत असल्याने त्यासाठी चार हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा खर्च अधिक असल्याने स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गिकेचा प्रस्ताव ‘पीआयबी’च्या मान्यतेसाठी सादर करण्यात आला होता. ‘पीआयबी’च्या गुरुवारी झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याने तो अंतिम मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात येणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पुणे विमानतळाच्या नव्या टर्मिनलच्या उद्घाटनासाठी येण्याची शक्यता आहे. त्यांच्या याच भेटीत मेट्रोच्या रामवाडीपर्यंतची मार्गिका प्रवाशांसाठी खुली होण्याची शक्यता असून, त्यासह पिंपरी-चिंचवड ते निगडी आणि स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या विस्तारित मार्गिकांचे भूमिपूजन केले जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाकडून हा प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळासमोर केव्हा सादर केला जाणार, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
भूतांत्रिक सर्वेक्षण लवकरच
स्वारगेट-कात्रज मेट्रो मार्गाला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता गृहित धरून या मार्गावर महामेट्रोकडून भूतांत्रिक सर्वेक्षण सुरू केले जाणार आहे. भूमिगत मेट्रोचे काम सुरू करण्यापूर्वी जमिनीपासून किती खोलीवर कठीण दगड आहे, जमिनीचे स्तर कसे आहेत, याचा अभ्यास करण्यात येतो. त्यासाठी प्रक्रिया महामेट्रोने सुरू केली आहे.
स्वारगेट ते कात्रज दरम्यानचे अंतर
५.६ किमी
तीन स्टेशन्स
मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज
विस्तारित मेट्रोचा अंदाजित खर्च
३ हजार ६०० कोटी रुपये