मांजरेकर यांनी सांगितले की, या परिषदेसाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोन दिवसीय बिझनेस समिटसाठी प्रमुख पाहुणे आहेत. निर्यात वृद्धी, नेटवर्किग आणि ज्ञानाचे आदान प्रदान करण्यासाठी तसेच व्यावसायिक संबध दृढ करण्यासाठी महाबिझ होत आहे.
मांजरेकर यांनी सांगितले की, उद्योग व्यवसाय क्षेत्रातील विविध परिषद, प्रदर्शनात सहभागी होऊन संपर्क वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांना जीएमबीएफ पाठबळ देईल. तसेच महाराष्ट्रातील उद्योजक, व्यावसायिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी गेल्या १६ वर्षापासून जीएमबीएफ कार्यरत आहे. या फोरमची सदस्य संख्या ५०० इतकी आहे. दुबईत नोकरी करणाऱ्या महाराष्ट्रातील १५० जणांना उद्योजक, व्यावसायिक बनविण्याचे काम फोरमने केले आहे. दर महिन्याला मेळावा घेऊन त्यामध्ये उद्योग, व्यवसायाबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. महाराष्ट्रातून आलेले ३० टक्के लोक दुबईत उद्योग व्यवसायात आहेत. नोकरी करणाऱ्यांचे प्रमाण ६० टक्के असून ते ४० टक्क्यांच्या खाली आणण्याचे आमचे ध्येय आहे.
या परिषदेत जगभरातून ९०० हून अधिक उद्योजकांचा सहभाग अपेक्षित आहे. यामध्ये सुमारे ७५० कोटी रुपयांच्या व्यवसायाची नोंद होण्याची अपेक्षा आहे. महाबिझ २०२४ साठी विविध क्षेत्रातील भागधारकांशी संवाद साधण्यासाठी आणि त्यांना आमंत्रित करण्यासाठी जीएमबीएफने देशातील विविध शहरात रोड शो आयोजित केला आहे. यापूर्वी महाबिझ २०२२ मध्ये सुमारे २५० कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. तर महाबिझ २०२४ मधून संयुक्त अरब अमिराती (यूएई) आणि भारतात ५०० कोटी रुपयांचा व्यवसाय अपेक्षित आहे, असेही मांजरेकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री, ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले, चेंबर निर्यात वृद्धीसाठी महाराष्ट्र चेंबर सातत्याने कार्यरत आहे. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्र चेंबरने आणली. शेकडो उद्योजकांना परदेशातील गुंतवणूक मिळवून दिली. इंडोनेशिया दौऱ्यात अनेक उद्योजकांना ही संधी मिळाली. तसेच महाराष्ट्र चेंबरने २९ देशांसोबत सामंजस्य करार केले आहेत. बांधकाम, औषध निर्माण, फाउंड्री, ऑइल अँण्ड गॅस, सेंद्रीय शेती उत्पादने, फळे आदी क्षेत्रात कोल्हापूरला दुबईसह आफ्रिकन देशांत काम करण्याची मोठी संधी आहे. कोरोनानंतर जगातील विविध देशांनी चीनच्या उत्पादनांवर घातलेली बंदी आणि मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविलेला देशाचा सन्मान याचा निर्यातीला चांगला परिणाम होत आहे.