• Sun. Sep 22nd, 2024

‘नंदनवन’ची उपयोगिता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

ByMH LIVE NEWS

Jan 18, 2024
‘नंदनवन’ची उपयोगिता वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची सूचना

सोलापूर (जिमाका), दि. 18 :  सोलापूर-नांदणी महामार्गावर वन विभागाच्या माध्यमातून साकारण्यात आलेले नंदनवन अतिशय सुंदर पद्धतीने विकसित केले आहे. या प्रकल्पाला जास्तीत जास्त सोलापूरकरांनी भेट द्यावी यासाठी उपयोगिता वाढविण्यावर भर द्यावा, अशी सूचना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज केली.

विजयापूर-सोलापूर महामार्गालगत नांदणी येथे वन विभागाने साकारलेल्या नंदनवन उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज झाले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, उपवनसंरक्षक  धैर्यशील पाटील, सरपंच शिवानंद बंडे, डॉ. चनगोंडा हविनाळे, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत हुल्ले यांच्यासह नांदणी गावचे ग्रामस्थ आणि वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, सोलापूर-विजयापूर महामार्गालगत पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात आलेले नंदनवन उद्यान उत्तम झाले आहे. उर्वरित टप्प्यातील काम जलद गतीने पूर्ण करावे. तसेच, उद्यानातील वनराईच्या संवर्धनासाठी वन विभागाने तातडीने प्रस्ताव तयार करुन पाठवावा. त्याला तात्काळ मान्यता देण्यात येईल. तसेच, या उद्यानाची उपयोगिता वाढावी यासाठी शाळांच्या सहली आयोजित कराव्यात. सोलापूरकरांना आकर्षण वाटेल, असे उपक्रम उद्यानात राबवावेत, अशा सूचनाही श्री. पाटील यांनी यावेळी केल्या.

श्री. पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश झपाट्याने प्रगती करत आहे. प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बलांना संपूर्ण देशात तीन कोटींपेक्षा जास्त घरे बांधून देण्यात आली. त्यापैकी ३० हजार घरे एकाच ठिकाणी बांधण्यात येत आहेत. त्यापैकी १५ हजार घरे तयार आहेत. उद्या दिनांक १९ जानेवारी रोजी पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण होणार आहे. देशातील अशा प्रकारे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून घरे उपलब्ध होणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. हा प्रकल्प संपूर्ण देशाला वेगळीच ओळख निर्माण करुन देईल, असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सोलापूरच्या निसर्गसौंदर्यात भर घालण्यासाठी नांदणी येथे वन उद्यान उभारण्यात आले आहे. संपूर्ण तालुक्यातील नागरिक आणि पर्यटकांसाठी आपले नांदणी वनउद्यान आता खुले झाले आहे. नागरिकांना नैसर्गिक सौंदर्यासह आता या उद्यानाचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.

लोकार्पणानंतर श्री. पाटील यांनी उद्यानाची संपूर्ण पाहणी केली. यावेळी उद्यानाच्या प्रवेशद्वारावर साकारण्यात आलेल्या शिल्पाचे कौतुक केले. तसेच, वृक्षारोपण करुन वनसंपदेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याचा संदेश दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed