• Sat. Sep 21st, 2024

राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ByMH LIVE NEWS

Jan 18, 2024
राज्यातील पायाभूत आरोग्य सुविधांत क्रांती होईल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई दि. १८ : राज्यातील १२ कोटी जनतेला अत्याधुनिक डिजिटल सेवेद्वारे गुणवत्तापूर्ण, जलद आणि सुलभ आरोग्य सेवा मिळणार आहे. या संदर्भात स्वित्झर्लंडमधील दावोस येथे हिताची एमजीआरएम नेटशी भागिदारी करण्यात आली असून त्यामुळे आरोग्य क्षेत्रात परिवर्तन होईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

एमएसटीएआर या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आरोग्य सेवा देण्यासाठी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मुख्यमंत्र्यांनी विविध मुद्द्यांवर काल चर्चा केली. एमएसटीएआर हा एक नाविन्यपूर्ण प्लॅटफॉर्म असून आयुष्मान भारत डिजिटल मिशन अनुरूप डिजिटल आरोग्य सेवा राज्यातील जनतेला देण्याची सुविधा यामध्ये आहे.

या भागिदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांती होईल. नागरिकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा मिळेल. शिवाय प्रत्येकाचे आरोग्य रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यात येईल. रिमोट पद्धतीने वैद्यकीय चाचण्या व तपासणी करण्यात येतील.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांना चांगली आरोग्य सेवा देणे हे आमचे उद्दिष्ट्य आहे.यामुळे या सेवा देण्याचा दर्जा उंचावण्यास मदत होईल.

हिताची एमजीआरएम नेटचा एमएसटीएआर प्लॅटफॉर्म हा नाविन्यपूर्ण उपक्रम आहे.आरोग्य सेवा देण्यातील अडचणी ओळखून सुलभरीत्या या सेवा देण्याची व्यवस्था यात विकसित करण्यात आली आहे. या भागिदारीमुळे राज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये मोठ्या प्रमाणात तांत्रिक प्रगती होऊन त्या अधिक कार्यक्षम बनतील.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed