• Sat. Sep 21st, 2024
आईचा वाढदिवस, सतेज-संजय यांच्या जोडीकडून विद्यार्थ्यांना दीड कोटींची शिष्यवृत्ती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापू : ज्या आईने प्रचंड काबाडकष्ट करत मुलांवर संस्कार केले, प्रगतीची दिशा दिली, त्या आईचा वाढदिवस इतरांसाठी प्रेरणादायी ठरावा म्हणून तिच्या हस्ते तब्बल १३६ मुलांना दीड कोटींपेक्षा अधिक रक्कमेची शिष्यवृत्ती देण्याचा कौतुकास्पद उपक्रम डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबियांनी राबविला. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील आणि आमदार सतेज पाटील यांच्या संकल्पेतून साकारलेल्या या अनोख्या उपक्रमाने आणि दातृत्वाने मुलांच्या आणि पालकांच्या चेहऱ्यावर समाधान आनंदाची लकेर उमटली.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पत्नी शांतादेवी पाटील यांचा बुधवारी ८५ वा वाढदिवस होता. या निमित्ताने ज्या समाजाने भरभरून दिले, त्याच्या प्रति आपलंही काही देणं लागतं, ही सामाजिक बांधिलकीची भावना ठेवत त्यांच्या संजय आणि सतेज या दोन मुलांनी आगळा वेगळा उपक्रम राबविला. यामध्ये त्यांची मुलं, सुना, सर्व बहिणी यासह कुटुंबातील सर्व सदस्य सहभागी झाले. त्यांच्या उपक्रमाने सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप च्या माध्यमातून विविध शाखेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची फी तर माप केलीच, शिवाय शिक्षणासाठी मदतही देण्यात आली. तब्बल एक कोटी ६४ लाख रूपये एवढी मोठी मदत मुलांना मिळाली.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते ही शिष्यवृत्ती देण्यात आली. डॉ. डी. वाय. पाटील कुटुंबीय राजर्षी शाहू महाराजांचा दातृत्वाचा वारसा पुढे नेण्याचे काम उत्कृष्टपणे पार पाडत आहे. ‘सौ.शांतादेवी डी. पाटील मेरीट स्कॉलरशिप’च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या ठिकाणाहून सन्मानाबरोबरच जीवनाची मूल्ये सोबत घेऊन जावीत असे आवाहन त्यांनी केले.

तळसंदे येथील डी. वाय.पाटील एज्युकेशनल सिटी येथील शांताई सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय.पाटील, सौ.शांतादेवी डी. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ.संजय पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, स्कॉलरशिप स्कीमचे अध्यक्ष आमदार ऋतुराज पाटील, उपाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, शांतीनिकेतनच्या संचालिका राजश्री काकडे, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले आदी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कार्यकारी संचालक ए. के.गुप्ता यांनी केले.

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, आई वडिलांचे संस्कार आणि त्यांनी केलेले कष्ट न विसरता विद्यार्थ्यांनी आयुष्यात कार्यरत राहून इतर विद्यार्थ्यांना मदत करावी. येथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाने किमान एक विद्यार्थी दत्तक घेऊन त्याला चांगले शिक्षण द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed