• Mon. Nov 25th, 2024
    रावसाहेब दानवेंना आव्हान कुणाचं? जालन्याचा इतिहास काय सांगतो? यावेळी निवडणुकीत काय होईल?

    अक्षय शिंदे, जालना : सध्या देशभरात लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी सुरू झाली आहे. राज्यातील अन्य मतदारसंघात उमेदवारीसाठी चढाओढ सुरु झालेली असताना जालन्यात मात्र भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांना शह देण्यासाठी एकाही पक्षाचा उमेदवार पुढे येताना दिसत नाही. त्यामुळे सलग पाच वेळा निवडून आलेले दानवेंची सहाव्यांदा दिल्ली वारी पक्की असल्याचं बोललं जातंय.

    लोकसभा निवडणूक १९९६ आणि १९९८ मध्ये उत्तमसिंग पवार हे भाजपतर्फे निवडून आले होते. १९९९ मध्ये काँग्रेसचे उमेदवार ज्ञानदेव बांगर यांचा पराभव करीत रावसाहेब दानवे हे प्रथमच खासदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर सलग पाच वेळा रावसाहेब दानवे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. १९९९ मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्यपदी निवडून येण्यापूर्वी दोन वेळेस ते भोकरदन विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. रावसाहेब दानवे यांचे भाजपासोबतच विरोधी पक्षांतील अनेक लहान-मोठ्या नेत्यांशी त्यातही काँग्रेसमधील पुढाऱ्यांशी सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांना लोकसभा निवडणुकीत फारसे प्रयत्न करावे लागले नाहीत.

    वेध लोकसभा निवडणुकीचा : काँग्रेस बालेकिल्ला काबिज करणार की भाजप बाजी मारणार? वंचित-बीआरएस भूमिकेकडे लक्ष
    विरोधकांकडे प्रबळ उमेदवार नाही

    भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्या विरोधात आतापर्यंत काँग्रेसचे उमेदवारच निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. मात्र तीन महिन्यावर येऊन ठेवलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी अद्यापही काँग्रेसच्या वतीने लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरलेला नाही. गतवर्षी जालना लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यावा, असा सूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते मंडळींमध्ये होता. सद्य परिस्थितीमध्ये रावसाहेब दानवे यांना शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडेही सक्षम असा उमेदवार नसल्याचे चित्र आहे.

    वेध लोकसभा निवडणुकीचा: रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पुन्हा राऊत की महायुती बाजी मारणार? वाचा संपूर्ण समीकरण
    शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शिवाजीराव चोथे हे जालना लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असल्याची चर्चा असली तरी महाविकास आघाडीच्या जालना जिल्ह्यातील नेते मंडळींचं यावर अद्याप एकमत झाले नसल्याचे सांगितले जाते. १९९९ नंतर भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा पराभव करणे काँग्रेसच्या उमेदवारांना शक्य झालेले नाही, त्यामुळे आता शिवसेनेचा ठाकरे गट महाविकास आघाडी सोबत लढत असल्याने ही जागा ठाकरे गटाला सुटेल अशी देखील चर्चा आहे.

    कोल्हापूरच्या जागेवरुन तिढा, मविआच्या तिन्ही पक्षांची दावेदारी, उमेदवार कोण असणार? महायुतीमध्येही संभ्रम
    खोतकरांची तलवार म्यान

    रावसाहेब दानवे आणि शिवसेना शिंदे गटात गेलेले माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचे राजकीय वैर सर्वश्रुत आहे. २०१९च्या लोकसभेच्या निवडणुकीत रावसाहेब दानवेंच्या विरोधात अर्जुन खोतकर हे दंड थोपटणार असल्याची चर्चा देखील रंगली होती. मात्र निवडणुकीआधी त्यांचं मनोमिलन झालं. संभाव्य कुस्तीतून आघाड्यात उतारण्याआधीच त्यांनी माघार घेतली. जालना लोकसभा मतदारसंघात दानवेंना खोतकरच फाईट देऊ शकतात, अशी देखील चर्चा आहे. परंतु आता खोतकर हे शिंदे गटात असल्याने त्यांची भाजपासोबत युती आहे. त्यामुळे या लोकसभेला खोतकर निवडणूक लढवतील अशी शक्यता कमीच आहे.

    वेध लोकसभा निवडणुकीचा : अहमदनगरमध्ये उमेदवारीसाठी सत्ताधाऱ्यांमध्येच चुरस, प्रत्यक्ष निवडणुकीत काय होणार?
    संधी मिळाल्यास काँग्रेस-राष्ट्रवादीकडून कोण लढू शकतं?

    भाजपचे रावसाहेब दानवे यांच्या विरोधात १९९९ पासून सलग पाच वेळा काँग्रेसचा उमेदवाराचा पराभव झालेला आहे. मात्र २००९ च्या लोकसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांना कल्याण काळे यांच्या विरोधात केवळ आठ हजारांच्या अल्पमतांनी विजय मिळाला होता. त्यामुळे यंदा काँग्रेस पक्षाकडून कल्याण काळे यांनाच मैदानात उतरविण्याची अधिक शक्यता असल्याचे बोलले जाते. तर दुसरीकडे राष्ट्रवादीकडून पैठणचे माजी आमदार संजय वाघचौरे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. दोघेही संधी मिळाल्यास लढण्यास तयार असल्याचे सांगत आहेत.

    वेध लोकसभा निवडणुकीचा : तीन राज्यांच्या विजयाने मनोबल उंचावले तरी भाजपसाठी सोपी नसेल पुणे लोकसभा!

    जालना लोकसभा मतदारसंघात कोणकोणते विधानसभा मतदारसंघ?

    जालना लोकसभा मतदारसंघात जालना जिल्ह्यातील जालना, भोकरदन, बदनापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड , पैठण, फुलंब्री या तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed