येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित कृषिक २०२४ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. चेलुवरयास्वामी यांच्या हस्ते येथे देशातील पहिल्या फार्म ऑफ द फ्युचरचे उदघाटन पार पडले. चेलुवरयास्वामी म्हणाले, कर्नाटकात ३३ कृषी विज्ञान केंद्र आहेत. कर्नाटकातील बेळगावीचे केंद्र खा. पवार यांच्यामुळेच उभे राहू शकले. मथीकोपा येथील केंद्राचे उदघाटन खुद्द पवार यांनी केले. त्यांनी कृषीमंत्री पदाच्या कालावधीत देशाच्या कृषी क्षेत्रात मोठे काम केले. परिणामी अन्नधान्य आयात करणारा देश निर्यातदार बनला. कर्नाटक सरकारच्या अन्नभाग्य, गृहलक्ष्मी, गृहज्योती, स्त्री शक्ती आणि युवाशक्ती या पाच योजनांसाठी ७२ कोटींची तरतूद केल्याचे ते म्हणाले.
राजस्थानपाठोपाठ कर्नाटकात कोरडवाहू जमिन अधिक आहे. त्यामुळे मृद व जलसंवर्धनासाटी २०० कोटींची तरतूद केली असल्याचे त्यांनी सांगितले.जगभरातील नवनवीन तंत्रज्ञान बारामतीत राबवले जात असून शेतकऱयांसाठी ते दिशादर्शक असल्याचे चेलुवरयास्वामी म्हणाले. खा. शरद पवार, सुळे, ट्रस्टचे विश्वस्त प्रताप पवार, डॉ. जावकर, डॉ. मिश्रा यांचीही यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविकात ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी केंद्राच्या आजवरच्या कामगिरीचा आढावा घेतला.
इंदिरा गांधी यांच्यापासून ते राहूल गांधीपर्यंतच्या कार्यकाळात देशातील शक्तीशाली राष्ट्रीय नेतृत्व म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जाते. त्यांनी देशपातळीवर संरक्षण व कृषी मंत्री म्हणून भरीव काम केले. त्यामुळेच देशातील सर्व राजकीय पक्षांकडून त्यांचे नाव आदराने घेतले जाते. एक वादातीत व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी कृषी क्षेत्रात केलेल्या कामामुळेच सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडू शकले. देशातील नवीन कृषीमंत्र्यांसाठी ते आदर्श आहेत, या शब्दात कर्नाटकाचे कृषीमंत्री एन. चेलुवरयास्वामी यांनी शरद पवार यांचे कौतुक केले.