• Mon. Nov 25th, 2024

    नाशिकला यंदाही ठेंगाच? गुंतवणुकीसाठी संभाव्य जिल्ह्यात उल्लेख नाही, उद्योजकांचे दावोसकडे लक्ष

    नाशिकला यंदाही ठेंगाच? गुंतवणुकीसाठी संभाव्य जिल्ह्यात उल्लेख नाही, उद्योजकांचे दावोसकडे लक्ष

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्यात अडीच लाख कोटींची गुंतवणूक येणार असली, तरी गुंतवणुकीसाठीच्या राज्यातील संभाव्य जिल्ह्यांमध्ये क्षमता असूनही नाशिकचा नामोल्लेख नाही. त्यामुळे नाशिकच्या हाती यंदा पुन्हा एकदा धुपाटणेच लागण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे उद्योजकांकडून मात्र दहा हजार ते पंचवीस हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

    गेल्या वर्षी दावोस आर्थिक परिषदेच्या माध्यमातून राज्य सरकारने जगभरातील निरनिराळ्या कंपन्यांशी १ लाख ३७ हजार कोटींचे करार केले होते. त्या माध्यमातून राज्यात कोट्यवधींची गुंतवणूक होणार असल्याचेही जाहीर केले होते. मात्र, त्यात नाशिकचा समावेश नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी घाईघाईने पत्रकार परिषद घेऊन ‘महिंद्रा अॅण्ड महिंद्रा’चा दहा हजार कोटींचा विस्तारित प्रकल्प नाशिकला होणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, हा प्रकल्प अहमदनगर जिल्ह्यात होणार असल्याचे नंतर समोर आले होते. त्यामुळे गेल्या वर्षी नाशिक जिल्ह्याची झोळी रिकामीच राहिली होती. आता कालपासून पुन्हा एकदा ही परिषद सुरू झाली असून, त्यासाठी मुख्यमंत्री, उद्योगमंत्री रवाना झाले आहेत. येत्या १९ जानेवारीपर्यंत ही परिषद चालणार असून, अखेरच्या दिवशी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. गुंतवणूक होणाऱ्या राज्यातील संभाव्य जिल्ह्यांमध्ये मुंबई, पुण्यासह नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. विदर्भ, मराठवाडा व कोकणातील राजकीय नेते वजनदार असल्याने, ते त्यांच्या जिल्ह्यांत गुंतवणूक खेचून नेत असताना, दुसरीकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला मात्र कोणी वालीच नसल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर दावोस परिषदेतून नाशिकच्या पदरात नेमके काय पडणार, याविषयी उद्योग क्षेत्रात उत्सुकता आहे.

    नाशिक जिल्ह्याच्या क्षमता, शक्तिस्थळांबाबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी पूर्वीच बोलणे झाले आहे. ते स्वत:ही नाशिकला अनेकदा येऊन गेले आहेत. त्यांना नाशिकच्या क्षमता माहीत आहेत. त्यामुळे नाशिकला नक्कीच काही मिळण्याची अपेक्षा आहे.- दादा भुसे, पालकमंत्री, नाशिक
    नाशिकमध्ये वसंत गितेंची पुन्हा ‘मिसळ डिप्लोमसी’; मविआसह महायुतीच्या नेत्यांनाही आमंत्रण
    काय आहेत अपेक्षा?

    १. नाशिकमध्ये किमान दोन अँकर युनिट यावेत, अशी उद्योग क्षेत्राची अपेक्षा आहे.

    २. निमा पॉवर प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी नाशिकला इलेक्ट्रॉनिक-इलेक्ट्रिक क्लस्टर मंजुरीची घोषणा केली होती. त्याला सहा महिने उलटूनही त्याबाबत फारशी हालचाल झालेली नाही. त्यामुळे दावोस परिषदेतून या क्षेत्रातील दोन मोठे उद्योग आल्यास क्लस्टरला चालना मिळू शकणार आहे.

    नाशिक जिल्ह्यात गुंतवणूक यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अक्राळे (ता. दिंडोरी) येथे रिलायन्स लाइफ सायन्सचा साडेतीन हजार कोटी रुपये गुंतवणुकीचा प्रकल्प आला असून, त्याचे काम सुरू आहे. येत्या मार्चअखेरीस तो सुरू होण्याची अपेक्षा आहे.- नितीन गवळी, प्रादेशिक अधिकारी, औद्योगिक विकास महामंडळ

    नुकतेच उद्योगमंत्र्यांशी बोलणे झाले. इलेक्ट्रिकल क्लस्टरसाठी दोन मोठे उद्योग द्यावेत, अशी मागणी केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांना भेटण्यासाठीही प्रतिनिधी मंडळ रवाना झाले आहे. नाशिकसाठी २५ हजार कोटींच्या गुंतवणुकीची अपेक्षा आहे.- धनंजय बेळे, अध्यक्ष, निमा

    उद्योगवाढीसाठी पूरक सर्व बाबी नाशिकमध्ये आहेत. नाशिकमध्ये येऊ पाहणाऱ्या सर्व उद्योगांच्या मदतीसाठी उद्योजक तत्पर आहेत. नाशिकमध्ये इलेक्ट्रिकल-इलेक्ट्रॉनिक्स, सेमी कंडक्टर व फार्मास्युटिकल या तीन क्षेत्रांतील उद्योग येणे फायद्याचे ठरेल.- निखिल पांचाळ, अध्यक्ष, आयमा

    नाशिकमध्ये जागेची अडचण आहे. त्यामुळे सिन्नर, वाडीवऱ्हे, गोंदे, विल्होळी या भागांत उद्योगांसाठी अधिकाधिक जागांची उपलब्धता करून द्यायला हवी. मोठे उद्योग आणण्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घ्यावा. त्यांना उद्योजक सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहेत. दहा हजार कोटींची गुंतवणूक नाशिकमध्ये येण्याची गरज आहे.- सुधीर मुतालिक, राष्ट्रीय पदाधिकारी, सीआयआय

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed