• Mon. Nov 25th, 2024

    मित्रांच्या वडिलांना हॉस्पिटलला नेलं, मृत्यू जवळून पाहणाऱ्या तरुणालाही हार्ट अटॅक, एकाच वेळी दोन अंत्ययात्रा

    मित्रांच्या वडिलांना हॉस्पिटलला नेलं, मृत्यू जवळून पाहणाऱ्या तरुणालाही हार्ट अटॅक, एकाच वेळी दोन अंत्ययात्रा

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मित्राच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलेल्या तरुणाचाही रुग्णालयातच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सोमवारी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान नाशिकरोड येथील पालिकेच्या नवीन बिटको रुग्णालयात घडली. आतिश देविदासन नायर (वय ३९, रा. राम कुटीर हाउसिंग सोसायटी, जुना सायखेडा रोड, उपनगर) असे या घटनेतील मृताचे नाव आहे.

    आतिश यांचा मित्र निशांत जाधव यांचे वडील विजय जाधव (वय ७३) हे घरी असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागले. निशांत यांनी ही माहिती आतिश यांना कळविल्याने आतिशने स्व:च्या दुचाकीवरून डॉक्टरांना निशांत यांच्या घरी नेले. परंतु, विजय जाधव यांची प्रकृती जास्तच खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला सोबतच्या डॉक्टरांनी दिला. त्यानुसार आतिश आणि निशांत यांनी तातडीने विजय जाधव यांना एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, सदर रुग्णालयातील डॉक्टरांनी विजय जाधव यांना पालिकेच्या बिटको रुग्णालयात दाखल करण्यास सांगितल्याने दोघांनी त्यांना तेथे दाखल केले.

    या ठिकाणी जाधव यांना डॉ. ओसवाल यांनी तपासले असता त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. हा सर्व प्रकार आतिश यांच्या डोळ्यांसमोर घडला. काही वेळाने त्यांनाही अस्वस्थ वाटू लागल्याने जाधव यांना ज्या वाहनातू रुग्णालयात आणले होते, त्याच वाहनात आराम करण्यासाठी आतिश जाऊन बसले. मात्र, येथेच छातीत त्रास होऊन हृदयविकाराचा झटका आला. त्याला लागलीच बिटको रुग्णालयात दाखल केले असता डॉ. हेमंत काळे यांनी तपासून त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. आतिश हे उच्चशिक्षित असून, त्यांच्या पश्चात आईवडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

    संकटात सापडलेल्या मित्राच्या वडिलांचे प्राण वाचविण्यासाठी धावून गेलेल्या मित्राचीच प्राणज्योत मालवल्याच्या या घटनेमुळे नाशिकरोडच्या जेलरोड, उपनगर भागातून हळहळ व्यक्त करण्यात आली. या दोघांच्याही मृत्यूची नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

    मुलाला मारण्याआधी गायली अंगाई; कफ सिरप, डॉक्टरांना फोन अन्.. सूचनाने चौकशीत काय-काय सांगितलं?
    Read Latest Maharashtra News And Marathi News

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *