अखेर आमदार योगेश कदम यांनी काही वेळातच दापोली भाजप कार्यालय गाठत या सगळ्या वादावर तूर्तास पडदा पाडला आहे. त्यामुळे आज होणारी दापोली विधानसभा मतदारसंघातील महायुतीची झालेली बैठक फार मोठ्या कोणत्याही चर्चेविना पार पडली आहे. दापोली नगरपंचायतीत अजितदादांचा राष्ट्रवादीचा गट हा ठाकरे गटाबरोबर सत्तेत सहभागी आहे. हे चित्र महायुतीसाठी विरोधाभास दर्शवणारे आहे. या विषयावरही या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता होती. मात्र या सगळ्या प्रकारामुळे बैठकीच्या रंगाचा बेरंग झाल्याची चर्चा काही पदाधिकाऱ्यांमध्ये रंगली होती.
दापोली शहरातील फाटक कॅपिटल सभागृहात ही बैठक घेण्यात आली होती. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आता शंभर दिवस शिल्लक असून आपल्या हातात वेळ कमी आहे. त्यामुळे तिन्ही पक्षांनी जो लोकसभा उमेदवार असेल त्याचं काम करायचं आहे, असा विषय मांडला. या विषयानंतर शिवसेनेचे दापोली विधानसभा क्षेत्राचे मंडणगड येथील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांनी साठे यांचे म्हणणे खोडून काढत साठे यांनी आता आपली युती थोडे दिवस असल्याचे सांगितले. तसेच स्थानिक भाजप पदाधिकारी सहकार्य करत नाहीत आणि खासदार सुनील तटकरे तसेच आमदार योगेश कदम यांची साथ आम्ही २५ वर्षे सोडणार नाही असे या पदाधिकाऱ्याने बैठकीत सांगितल्याने बैठकीत मोठा गदारोळ उडाला.
यावरुन संतप्त झालेले भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी आम्ही हे ऐकून घेण्यासाठी या बैठकीत आलेलो नाही असं सांगत त्यांच्यासह सगळेच पदाधिकाऱ्यांनी ही बैठक सोडून बाहेर जाणे पसंत केले. तिळगुळ घ्या गोड बोला असं म्हणत मकर संक्रांत साजरी करण्याऐवजी ही बैठक तिखट झाली. या गदारोळानंतर भाजप पदाधिकारी दुखावल्याने आमदार योगेश कदम यांनीही आपल्या या पदाधिकाऱ्याचे कान टोचले आहेत. यानंतर या बैठकीदरम्यान शिवसेनेच्या या मंडणगड येथील पदाधिकाऱ्याने दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती आहे. या बैठकीत हा सगळा प्रकार घडल्याची माहिती महायुतीमधील एका पदाधिकाऱ्याने खाजगीत दिली आहे. अखेर बैठक संपल्यानंतर आमदार योगेश कदम यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भाजप कार्यालय गाठले. जिल्हाध्यक्ष पदासाठी यांची भेट घेत अर्धा तास झालेल्या चर्चेनंतर एकमेकांना तिळगुळ वाटून शेवट गोड करण्यात आला.