• Mon. Nov 25th, 2024

    शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून प्रगतीशिल शेतकरी बनावे – पालकमंत्री संजय राठोड

    ByMH LIVE NEWS

    Jan 14, 2024
    शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून प्रगतीशिल शेतकरी बनावे – पालकमंत्री संजय राठोड

    यवतमाळ, दि. 14 : शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारुन आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानासोबत नाविण्यपूर्ण प्रयोग करत शेतकऱ्यांनी प्रगतीशिल बनावे, असे आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले

    यवतमाळ शहरातील समता मैदानात आयोजित जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शनीचे उद्घाटन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी प्रमोद लहाळे, आत्माचे प्रकल्प संचालक संत़ष डाबरे, माविमचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी रंजन वानखेडे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञ, अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी उपस्थित होते.

    पालकमंत्री पुढे म्हणाले, या जिल्हा कृषी महोत्सवाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना वेगवेगळ्या कृषी प्रदर्शनी पाहायला मिळणार आहेत.  त्यासोबत शेतीमध्ये उपयुक्त ठरणारे अनेक नवीन तंत्रज्ञानाचे मार्गदर्शन होणार आहे. राज्य शासनाने हा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे. या माध्यमातून शेतीमध्ये अजून चांगले काय करू शकतो याची कल्पना शेतकऱ्यांना मिळणार आहे, अशी अपेक्षा पालकमंत्र्यांनी व्यक्त केली.

    हरितक्रांतीचे प्रणेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये केलेल्या कार्यामुळे आज राज्य अन्नधान्यात स्वयंपूर्ण आहे. यवतमाळ पांढरे सोने उगवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आज कापूस, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शासन प्रशासन म्हणून आम्ही सुद्धा याबाबत चांगला मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहोत.येणाऱ्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांकडून चांगली बातमी शेतकऱ्यांना कळेल आणि त्याच्यातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी माहिती पालकमंत्र्यांनी दिली.

    सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी जिल्ह्यातील धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचण्यासाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. जलयुक्त शिवार योजना आणि मृद व जलसंधारण विभागाअंतर्गत जिल्ह्यात सहाशे कोटी रुपयांच्या योजना मंजूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी व त्यांचे मनोबल वाढले पाहिजे ही भूमिका घेऊन जिल्हास्तरावर वेगवेगळ्या योजना सुरू करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या मुलांसाठी मॉडेल शाळा सुरू करणार आहोत. वन्य प्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना सोलर झटका मशीन अनुदान तत्त्वावर देण्यात येणार आहे.

    या कृषी महोत्सव व प्रदर्शनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीतील नवीन गोष्टींची माहिती होणार आहे. शेतकऱ्यांनी कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान स्वीकारले पाहिजे. या नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शेतकऱ्यांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे. त्या माध्यमातून शेतकऱ्यांनी शेतीत प्रगती केली पाहिजे, अशी अपेक्षा पालकमंत्री संजय राठोड यांनी यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे. शेतकरी हितासाठी प्रामाणिकपणे काम करू, असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

    जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया म्हणाले, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना हा जिल्हा कृषी महोत्सव व प्रदर्शन उपयुक्त ठरणार आहे. या महोत्सवात विविध विभागाचे स्टॉस सुरू करण्यात आले आहेत. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले.यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व प्रगतीशिल शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी डॅा. आशिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक आत्माचे प्रकल्प संचालक संतोष डांबरे यांनी केले. सूत्रसंचालन चंद्रबोधी घायवट यांनी केले तर रंजन वानखेडे यांनी आभार मानले.

    या कृषी महोत्सवात कृषी निविष्ठा दालन, शासकीय योजनांची माहिती देणारे दालन, गृहोपयोगी वस्तूं, बचत गट, कृषी यंत्र व साहित्य, रोजगार दालन तसेच ईव्हीएम प्रात्यक्षिक केंद्र उभारण्यात आले आहेत. यावेळी शेतकरी, नागरिक या दालनांना भेट देऊन माहिती जाणून घेत होते. सदर महोत्सव व प्रदर्शन दि.१८ जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून त्याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

    000

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *